PM Modi in Palghar Maharashtra : मी छत्रपती शिवाजी महाराज यांंच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

  • पालघर जिल्‍ह्यातील वाढवण बंदराचा भूमीपूजन सोहळा

  • वाढवण बंदरातून सर्वाधिक आयात-निर्यात होणार असल्‍याचे सुतोवाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पालघर – सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील मालवणमधील राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्‍याने मी त्‍यांच्‍यापुढे नतमस्‍तक होऊन क्षमा मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही, तर ते आमचे आराध्‍यदैवत आहे.

माझे संस्‍कार वेगळे आहेत. मी क्षमा मागण्‍यासाठी सिद्ध आहे. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करूनही क्षमा न मागणार्‍यांपैकी मी नाही. माझे संस्‍कार वेगळे आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. येथील वाढवण बंदराच्‍या भूमीपूजनाच्‍या वेळी ते बोलत होते.

ते म्‍हणाले, ‘‘आजचा दिवस महाराष्‍ट्राच्‍या विकासासाठी ऐतिहासिक दिवस आहे. आमच्‍या सरकारने महाराष्‍ट्रासाठी मोठे निर्णय घेतले आहेत. माझ्‍या सरकारचा हा तिसरा कार्यकाळ आहे. महाराष्‍ट्राकडे विकासासाठी पायाभूत सुविधा आहेत. महाराष्‍ट्रात राज्‍य आणि देश यांचा विकास घडवून आणण्‍याची मोठी क्षमता आहे. त्‍यामुळेच वाढवण बंदराचे भूमीपूजन करण्‍यात आले. या बंदरासाठी जवळपास ७६ सहस्र कोटी रुपये खर्च करण्‍यात येणार आहेत. या बंदरामुळे महाराष्‍ट्र औद्योगिक प्रगतीचे होईल. जगातील सर्वांत खोल बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर वाढवण हे असेल. या बंदरातून सर्वाधिक आयात-निर्यात होईल. वर्ष २०१४ च्‍या आधी वाढवण बंदराचे काम रोखून धरण्‍यात आले होते. आमचे सरकार आल्‍यानंतर आम्‍ही या प्रकल्‍पावर काम चालू केले. तत्‍कालीन मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्‍पासाठी कष्‍ट घेतले. वर्ष २०१९ मध्‍ये आमची सत्ता गेली. तेव्‍हा अडीच वर्षे या प्रकल्‍पाचे काम रखडले. या प्रकल्‍पामुळे १२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. एवढी मोठी गुंतवणूक कुणी रोखून धरली, हे जनतेने विसरू नये. काही लोक महाराष्‍ट्राचा विकास रोखण्‍याचा प्रयत्न करत आहेत; मात्र केंद्र आणि राज्‍य शासन यांना महाराष्‍ट्राला देशात क्रमांक एकचे राज्‍य बनवायचे आहे.