दुर्घटनेच्या चौकशीसाठी तज्ञ समितीची स्थापना !
मुंबई – राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाचे तज्ञ कमोडोर पवन धिंगरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, स्ट्रक्चरल डिझाईनर विकास रामगुडे, मुंबईतील आयआयटीचे अभियंता प्रा. जांगीड आणि मेटलर्जी अभियंता प्रा. परीदा यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागील नेमकी कारणे कोणती याचा शोध ही समिती घेणार आहे. याविषयीचा अहवाल कधीपर्यंत सादर करावा, याचा कालावधी निश्चित करण्यात आलेला नसून अहवाल लवकरात लवकर सादर करावा, असे शासन आदेशात नमूद करण्यात आले आहे.