S Jaishankar On Pakistan : पाकिस्‍तानसमवेतच्‍या चर्चेचा काळ संपला !

  • भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्‍पष्‍टोक्‍ती

  • ‘चर्चेसाठी पाकला प्रथम आतंकवाद पूर्णपणे नष्‍ट करावा लागेल’, हेही केले स्‍पष्‍ट !

परराष्ट्रमंत्री डॉ. एस् जयशंकर

नवी देहली – शेजारी देशासमवेत (पाकिस्‍तानसमवेत) चर्चेचा काळ संपला आहे. आता त्‍याच्‍यासमवेत कोणत्‍या प्रकारच्‍या संबंधांची कल्‍पना करू ? आम्‍ही पूर्वी पाकिस्‍तानसमवेत चर्चा करण्‍यासाठी अनेक प्रयत्न केले; पण आतंकवादाच्‍या सूत्रावर त्‍याच्‍या दुहेरी धोरणांमुळे हे शक्‍य झाले नाही. पाकिस्‍तानने हे सूत्र समजून घेतले पाहिजे की, चर्चेसाठी त्‍याला आतंकवाद पूर्णपणे नष्‍ट करावा लागेल, अशा शब्‍दांत भारताचे परराष्‍ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना ‘पाकशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही’, हे स्‍पष्‍ट केले. या वेळी डॉ. जयशंकर यांनी पाकिस्‍तान, बांगलादेश आणि मालदीव यांच्‍याशी संबंधित काही सूत्रांवर मते मांडली.

डॉ. जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. शेजारी हे नेहमीच एक कोडे असल्‍याप्रमाणे असतात. असे कोणते देश आहेत, ज्‍यांना त्‍यांच्‍या शेजार्‍यांपासून आव्‍हाने नाहीत ?

२. भारत आता आतंकवाद आणि चर्चा यांना एकत्र पाहू शकत नाही. पाकिस्‍तानला जर भारतासमवेत चर्चा करायची असेल, तर त्‍याला त्‍याच्‍या  धोरणांचा पुनर्विचार करावा लागेल.

३. बांगलादेशातील विद्यमान सरकारशी आम्‍ही चर्चा करू. ही आमच्‍यासाठी नैसर्गिक गोष्‍ट आहे. आपल्‍याला हे मान्‍य करावे लागेल की, बांगलादेशात राजकीय पालट झाले आहेत आणि ते धोकादायक असू शकतात. येथे आपल्‍याला एकमेकांच्‍या हितांच्‍या गोष्‍टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल.

४. मालदीवच्‍या प्रति आमच्‍या दृष्‍टीकोनात चढ-उतार आले आहेत. येथे स्‍थिरतेची कमतरता आहे. हा असा संबंध आहे, ज्‍यामध्‍ये आम्‍ही पुष्‍कळ गुंतवणूक केली आहे.

५. सामाजिक स्‍तरावर लोकांमधील संबंध भक्‍कम आहेत. आज भारताचे अफगाणिस्‍तानसमवेत असलेल्‍या धोरणाची समीक्षा केल्‍यानंतर आपल्‍या लक्षात येईल की, आम्‍ही आमच्‍या हितांबद्दल अतिशय स्‍पष्‍ट आहोत. आपल्‍याला हे समजून घेतले पाहिजे की, अमेरिकेची उपस्‍थिती असतांनाचे अफगाणिस्‍तान आणि आता अमेरिका तेथे नसतांनाचा अफगाणिस्‍तान यांमध्‍ये भेद आहे.

पाकिस्‍तानकडून शांघाय सहकार्य संघटनेच्‍या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी यांना आमंत्रण

पाकची राजधानी इस्‍लामाबादमध्‍ये १५ आणि १६ ऑक्‍टोबरमध्‍ये होणार्‍या शांघाय सहकार्य संघटनेच्‍या बैठकीसाठी पाकिस्‍तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केले आहे. पाकिस्‍तानच्‍या विदेश कार्यालयाच्‍या प्रवक्‍त्‍या मुमताज जहरा बलूच यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.