Cows Thrown Into River : मध्‍यप्रदेशमध्‍ये गायींना नदीत ढकलल्‍याने १५ ते २० गायींचा बुडून मृत्‍यू

४ जणांना अटक

नदीमध्ये गावाहून जाण्याऱ्या गायी व अटक करण्यात आलेले आरोपी

सतना (मध्‍यप्रदेश) – गायींना पाण्‍याने तुडुंब भरलेल्‍या नदीत ढकलल्‍याने ५० पैकी १५-२० गायींचा बुडून मृत्‍यू झाला. याविषयीचा एक व्‍हिडिओ प्रसारित झाला असून त्‍यामध्‍ये काही लोक पुराच्‍या पाण्‍यात गायींना ढकलतांना दिसत आहेत. या व्‍हिडिओमध्‍ये गायी पुराच्‍या पाण्‍यात धडपडतांना दिसत आहेत. या प्रकरणी एका अल्‍पवयीन मुलासह ४ जणांना अटक करण्‍यात आली आहे. हे प्रकरण राज्‍यमंत्री प्रतिमा बागरी यांच्‍या विधानसभा मतदारसंघातील आहे.

१. भोपाळपासून ५१५ कि.मी. अंतरावर नागौड परिसरातील नदीकाठावरील बम्‍हौर गावात ही घटना घडली.

२. या घटनेचा व्‍हिडिओ बनवणार्‍या एका गावकर्‍याने पोलिसात तक्रार प्रविष्‍ट (दाखल) केली. पोलिसांनी ‘मध्‍यप्रदेश गाय संरक्षण कायद्या’च्‍या अंतर्गत गुन्‍हा नोंदवला. या प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी अवघ्‍या काही तासांत अटक केली.

३. नागौड पोलीस ठाण्‍याचे प्रमुख अशोक पांडे यांनी सांगितले की, आरोपींपैकी एक अल्‍पवयीन आहे. इतरांची नावे बीटा बागरी, रवि बागरी आणि रामपाल चौधरी आहेत. आरोपींना न्‍यायालयात उपस्‍थित करण्‍यात आले असता तिन्‍ही कारागृहात पाठवण्‍यात आले आणि अल्‍पवयीन मुलाला बाल पुनर्वसन निवारागृहात पाठवण्‍यात आले.

४. प्राथमिक अहवालानुसार सुमारे ५० गायी नदीत ढकलल्‍या गेल्‍या. त्‍यांपैकी १५-२० गायींचा मृत्‍यू झाला. घटनास्‍थळी बचावकार्य चालू असल्‍याचे पोलिसांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

प्राणीमात्रांवर दया करण्‍याची शिकवण देणारी भारतीय संस्‍कृती लोप पावत चालली आहे का ? असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांना पडल्‍यास ते चुकीचे ठरणार नाही !