भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !

पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !

आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवे शरीर आणि पाप-पुण्य कर्म, पशू-पक्ष्यांचा जन्म म्हणजे भोगजन्म असल्याने त्यांना कर्मफळ नसणे, ७ प्रकारच्या गती, अनेकांना पूर्वजन्मीची देणी चुकवावी लागणे अन् प्रत्येक जन्मी जिवात्मा तोच; पण देह भिन्न असणे’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज पुढील भाग प्रसिद्ध करत आहोत.

(लेखांक ४३)

लेखांक क्र. ४२ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/829422.html

पू. प्रा. सु.ग. शेवडे

१०. पितृलोक म्हणजे काय ?

पितृलोक असला पाहिजे. तेथे नित्य पितरांचे वास्तव्य असते. हे नित्य पितर विश्वाकडे नजर लावून बसलेले असतात. तेथून ते सज्जनांना साहाय्य आणि दुष्टांना शिक्षा करतात. यांचे वास्तव्य अन्य सूर्यमालिकेतील ग्रहांवर असण्याचा संभव आहे; कारण आकाशात अब्जावधी आकाशगंगा आहेत. त्या प्रत्येक आकाशगंगेत अब्जावधी सूर्य आहेत आणि त्या प्रत्येक सूर्याच्या भोवती फिरणारे ग्रह, तारे, नक्षत्रे इत्यादी असंख्य चांदण्यांच्या रूपाने वावरत आहेत. स्वर्गलोक, पितृलोक, नरकलोक, तसेच यमलोक, इंद्रलोक हे सर्व वेदशास्त्रांनी वर्णिलेले आहेत. त्यामुळे ते मिथ्या असण्याचा संभवच नाही. मग त्यांचे स्वरूप काय ? आकार केवढा ? तेथे कोण कोण रहातात ? त्यांचे जीवन कसे ? हा सगळा संशोधनाचा विषय आहे.

अक्रोधनाः शौचपराः सततं ब्रह्मचारिणः ।
न्यस्तशस्त्राः महाभागाः पितरः पूर्वदेवताः ।।

– मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक १९२

अर्थ : पितर हे क्रोधरहित, अंतर्बाह्य शुद्ध, सर्वदा ब्रह्मचारी, शस्त्र धारण न करणारे, महाभाग (दया, औदार्य, क्षमा, यश, वैभव, विद्वत्ता, सौजन्य आणि सुकर्म या ८ गुणांनी युक्त असलेले) आणि जवळजवळ देवतास्वरूप असे असतात.

मनोर्हैरण्यगर्भस्य ये मरीच्यादयः सुताः ।
तेषां ऋषीणां सर्वेषां पुत्राः पितृगणाः स्मृताः ।।

– मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक १९४

अर्थ : हिरण्यगर्भाचा पुत्र मनु, त्या मनूचे पुत्र मरीचि इत्यादी आणि त्या मरीचिऋषींचे जे पुत्र आहेत, त्यांना पितृगण (पितरांचा समुदाय) म्हणतात.

११. पितृगण आणि पितर

मनुस्मृतीत म्हटले आहे की, पितृगण हे क्रोधरहित, पवित्रतेने वागणारे, सतत ब्रह्मचारी, शस्त्र टाकून दिलेले, महात्मे आणि देवतांचेही पितर होत. ब्रह्मदेवाचा पुत्र मनू, त्याचे पुत्र मरिची इत्यादी. त्याचे पुत्र सोमप इत्यादी. जे आहेत, तेच नित्य पितर होत. या ब्रह्मांडातील अज्ञात विश्वाची उकल अद्याप विज्ञानाला मुळीच झालेली नाहीत. अर्थात् तसा प्रयत्नही झालेला ऐकिवात नाही.

१२. पितृलोकाचे स्थान

‘अन्तर्हितो हि पितृलोको मनुष्यलोकात् ।’

(तैत्तिरीयब्राह्मण, काण्ड १, प्रपाठक ६, खण्ड ८, अनुवाक ६),

म्हणजे ‘पितृलोक मनुष्यलोकापासून पुष्कळ दूर आहे.’ अर्थात् पितृलोक अदृश्य आहे. तो अन्य सूर्यमालेतच असावा. त्याचप्रमाणे स्वर्गादी लोकही असेच दूर दूर असावेत. या आणि अशा विषयांवर ‘लाइफ बियाँड डेथ वुइथ एव्हिडन्स’, ‘डेथ अँड मिस्टरीज् आफ्टर डेथ’, ‘स्पिरिट टीचिंग’ अशी अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

१३. पुनर्जन्म सिद्धांत

एकूण काय, तर जिवात्मा देह टाकून दिल्यावर दुसरे शरीर धारण करतो. नंतर तो त्याच्या कृतकर्मानुसार भोक्तव्य भोगतो. या कृतकर्म भोगण्यालाच ‘कर्मविपाक सिद्धांत’ म्हणतात.

तद्यथा पेशस्कारी पेशसो मात्रामपादायान्यन्नवतरं कल्याणतरं रूपं तनुत एवमेवायमात्मा इदं शरीरं निहत्याऽविद्यां गमयित्वाऽन्यन्नवतरं कल्याणतरं रूपं कुरुते ।

– बृहदारण्यकोपनिषद्, अध्याय ४, ब्राह्मण ४, वाक्य ४

अर्थ : ज्याप्रमाणे सोनार सोन्याला तापवून ठोकून दुसरे नवे सुंदर रूप देतो, त्याप्रमाणे हा आत्मा शरिराचा त्याग करून नवे अधिक सुंदर रूप प्राप्त करून घेतो.

या पुनर्जन्म सिद्धांताचा व्यावहारिक लाभ, म्हणजे मनुष्य शिक्षेच्या भीतीने पाप करणार नाही. नाही तर ‘मी दुसर्‍याला फसवू नये, मी पाप करू नये, मी चोरी करू नये’, असे आपणहून अनुशासन लावून घेण्याची या जगात दुसरी कोणती व्यवस्था आहे ? याचा अर्थ असा नव्हे की, लोकांना शिक्षेचा बागुलबुवा करण्यासाठी पुनर्जन्माची कल्पना प्रसृत करण्यात आली आहे, तर ही खरोखरच सृष्टीयंत्रणा आहे. कुणी यावर विश्वास ठेवो किंवा न ठेवो, या व्यवस्थेचा काही संबंध नाही. किंबहुना ही मनुष्याला केवळ तर्काने किंवा बुद्धीने कधी कळलीही नसती, अशी अदृश्य विश्वव्यवस्था ज्या वेदांनी, शास्त्रांनी, ऋषिमुनींनी, साधू-संतांनी जगापुढे खुली करून सांगितली, त्यांनी या मानवजातीवर अपूर्व प्रेम केले आहे, हे मानावेच लागेल, मग मनुष्याने वागावे तरी कसे ?

शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ।।

– ज्ञानेश्वरी, अध्याय १६, ओवी ४६०

अर्थ : शास्त्र जे टाकावे म्हणून म्हणेल, ते जरी राज्य असले, तरी ते गवताच्या काडीप्रमाणे समजावे आणि शास्त्र जे घ्यावे म्हणून सांगेल ते जरी विष असले, तरी प्रतिकूल समजू नये.’

(क्रमशः)

– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई (साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)

लेखांक क्र. ४४ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/830596.html