पुतळा ३५ फूट उंच असेल, याची आम्हाला माहिती नव्हती ! – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय
राजकोट (मालवण) दुर्गावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्याचे प्रकरण
मुंबई – राज्यात कुठेही महापुरुषांचा पुतळा उभारायचा असेल, तर त्यासाठी कला संचालनालयाची अनुमती घ्यावी लागते. राजकोट येथील किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी शिल्पकाराने आमच्यापुढे सादर केलेल्या आराखड्यामध्ये महाराजांचा पुतळा ६ फुटांचा असल्याचे नमूद करण्यात आले होते. पुतळा ३५ फूट उंचीचा उभारला जाणार होता, याची आम्हाला माहिती नव्हती, अशी माहिती कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी ‘टी.व्ही. ९’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले.
‘‘महापुरुषांच्या पुतळ्याला अनुमती देतांना कला संचालनालयाच्या समितीमधील तज्ञ, कला इतिहासकर आणि कलाकार यांचा समावेश असतो. ही समिती महापुरुषांच्या मुखावरील हावभाव, त्यांची शारीरिक रचना यांवर बारकाईने कटाक्ष टाकते. त्यानंतरच पुतळ्याच्या ‘क्ले मॉडेल’ला समिती अनुमती देते. या पुतळ्याच्या उभारणीमध्ये ‘स्टेनलेस स्टील’चा उपयोग केला जाणार होता, याविषयीही आम्हाला कल्पना नव्हती. पुतळ्याच्या चबुतर्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तूविशारदाकडून अनुमती घ्यावी लागते. त्यानंतरच शिल्पकाराला पुतळा निर्माण करण्यासाठी पत्र दिले जाते. यापुढील दायित्व शिल्पकाराचे असते. ज्या एजन्सीकडून पुतळा उभारला गेला, त्यांनी जर शिल्पकाराला पुतळ्याची उंची वाढवण्यास सांगितली असेल, तर शिल्पकाराने त्यासंबंधी अभ्यास करायला हवा होता. एवढ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी ‘स्ट्रक्चरल इंजिनिअर’चे साहाय्य घ्यावे लागते. पुतळा उभारतांना तेथील परिसराच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यायला हवी ? याचा अभ्यास न केल्यामुळे कदाचित् ही दुर्घटना घडली असावी.’’ – राजीव मिश्रा, संचालक, कला संचालनालय |
‘एस्.आय.टी.’ चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
मुंबई – राजकोट दुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथकाची नियुक्ती करावी. नौदल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अधिकार्यांवर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात यावा आणि राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केतन तिरोडकर यांनी याचिकेत केली आहे.
राजकोट दुर्गावर छत्रपती शिवरायांचा नवीन पुतळा उभारणार ! – मुख्यमंत्री
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना अाहे. याविषयी मी क्षमा मागतो. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्या निःपक्षपणे चौकशी करतील. छत्रपती शिवाजी महाराज हा राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनी या प्रकरणी राजकारण करू नये. राजकोट दुर्गावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन पुतळा उभारू, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले.
भारतीय नौदल पुतळा कोसळल्याच्या घटनेची चौकशी करणार !
मुंबई – राजकोट दुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. या समितीमध्ये तांत्रिक तज्ञ आणि महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. शिवरायांचा पुतळा लवकर पुनर्स्थापित करण्यासाठी सरकारला सर्वतोपरी साहाय्य करण्यासाठी भारतीय नौदल कटीबद्ध आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा चबुतरा बांधणारे सल्लागार डॉ. चेतन पाटील पसार !
कोल्हापूर – पुतळा कोसळल्याच्या प्रकरणी बांधकाम सल्लगार डॉ. चेतन एस्. पाटील यांच्यावर मालवण येथे सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या तक्रारीत पाटील हे कोल्हापूरचे रहिवासी असल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे मालवण पोलीस जुना राजवाडा पोलिसांच्या साहाय्याने त्यांच्या कोल्हापूर येथील घरी पोचले. त्या वेळी डॉ. पाटील यांच्या घराला कुलूप असून ते पसार झाल्याचे पोलिसांना आढळून आले.
पुतळा उभारणी आणि त्यासाठी चबुतरा बांधकामाची निविदा निघाल्यावर डॉ. पाटील यांनी भरली आणि ते काम त्यांना मिळाले होते. यानंतर या पुतळ्याचे काम कारागीर जयदीप आपटे यांच्याकडे, तर चबुतरा बांधकामासह ‘स्ट्रक्चरल सल्लागार’ म्हणून डॉ. चेतन पाटील यांना काम देण्यात आले होते. डॉ. पाटील यांच्या पत्नी डॉक्टर असून त्यांचे खासगी रुग्णालय आहे. या प्रकरणी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना डॉ. चेतन पाटील म्हणाले, ‘‘या पुतळ्याशी माझा काही संबंध नाही. मी केवळ चबुतर्याचे ‘डिझाईन’ दिले होते. या चबुतर्यावर ११ टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी ते बनवले. हा पुतळा उभारणीचे काम ठाण्यातील एका आस्थापनाला देण्यात आले होते. माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याचे मला समजले असून योग्य ठिकाणी मी माझी बाजू मांडीन.’’