लातूर येथील ‘गंज गोलाई’चे नाव ‘आजमगंज गोलाई’ करण्याचे जिहादी कारस्थान थांबवा !
‘वीरयोद्धा संघटने’ची मनपा आणि पोलीस यांना निवेदनाद्वारे मागणी !
लातूर – ऐतिहासिक वारसा असलेली लातूरच्या ‘गंज गोलाई’ची ओळख देशभरात आहे. अशा वास्तूचे नाव पालटण्याचे जिहादी मनोवृत्तीचे कारस्थान काही समाजकंटकांकडून केले जात आहे. गंज गोलाईचे नाव पालटून ते आजमगंज करण्याचे जिहादी कारस्थान केले जात आहे. ते तात्काळ थांबवावे, अशा आशयाचे निवेदन २७ ऑगस्टला ‘वीरयोद्धा संघटने’च्या वतीने मनपा आयुक्तांना आणि गांधी चौकी पोलीस ठाण्यात देण्यात आले.
निवेदनात विरयोद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत रांजनकर यांनी म्हटले आहे की,
१. एका कंधारी प्लास्टिक या दुकानाच्या विक्रीच्या पिशव्यांवर आजमगंज गोलाई असा पत्ता छापला आहे. ज्याचे मूळ नाव गंज गोलाई असे आहे. लातूरच्या गंज गोलाईला आणि गोलाईत असलेल्या देवीला ऐतिहासिक आणि पुरातन वारसा आहे.
२. गंज गोलाई ही संपूर्ण देशात लातूरची ओळख आहे. संपूर्ण लातूरच्या जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या श्री भवानीदेवीचे मंदिरही याच गोलाईत आहे. सहस्रो वर्षांची परंपरा असलेल्या या ऐतिहासिक वास्तूचे नाव पालटण्याचे जिहादी मनोवृत्तीचे कारस्थान जाणून बुजून काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांकडून केले जात आहे. असे प्रकार येथे कदापीही खपवून घेतले जाणार नाहीत. त्यांना तात्काळ आवर घालावा.