अविवेकावर मात करा !
‘वडिलांनी ‘आयफोन’ आस्थापनाचा भ्रमणभाष घेऊन दिला नाही; म्हणून मुलाने आत्महत्या केली’, अशी बातमी वाचली. काही मुलींनी महाविद्यालयामध्ये काहीतरी चुकीची कृती केली; त्यातील एका मुलीने महाविद्यालयातून काढतील, या भीतीने आत्महत्या केली. जीवन एवढे स्वस्त झाले आहे का ? एकीकडे मुलांचा बुध्यांक वाढल्याचे ऐकतो आणि दुसरीकडे मुलांची सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होत चालल्याचे दिसून येत आहे. यावर उपाय काय ? ‘जन्मापासून मुलांवर योग्य धर्मसंस्कार होत नाहीत’, असेच जाणवते. एकत्र कुटुंबपद्धत मोडली. पती-पत्नी दोघेही नोकरी करू लागले. मुलांना वेळ देऊन त्यांच्यावर संस्कार करणे त्यांना शक्य होत नाही. पाळणाघरात प्रत्येक मुलावर संस्कार होतील, अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. मुलांना सांभाळण्यासाठी घरी एखादी बाई ठेवली, तरी ती मुलावर संस्कार करू शकणार नाही. अशातच मुले जेवत नाहीत; म्हणून पालक त्यांच्या हातात भ्रमणभाष देतात. त्यामध्ये क्षणिक मनोरंजनांचे कार्यक्रम बघण्यात त्या मुलाला गुंतवून ठेवतात. मग या मुलांवर चांगले संस्कार होणे, त्यांची मन-बुद्धी विकसित होणे, अशी अपेक्षा कशाच्या जोरावर करायची ? ही मुले संकुचित विचारांची होतात, त्यांच्यात प्रगल्भता येत नाही. विवेक त्यांच्यापासून दूर रहातो आणि मग अशी मुले आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतात.
शिक्षणक्षेत्रही स्वार्थाने आणि भ्रष्टाचाराने बरबटले असल्याचे लक्षात येते. इंग्रज गेले; परंतु आजपर्यंत ‘तकलादू इंग्रजी शिक्षणाऐवजी मुलांना भारतीय संस्कृतीचे धडे गिरवायला द्यायला हवेत’, हा विचार रुजला नाही. त्यामुळे अनेक पिढ्या खरे ज्ञान मिळवण्याऐवजी स्पर्धा परीक्षा आणि अधिक वेतनाच्या नोकर्या मिळवून देणार्या परीक्षांच्या मागे लागल्या. धर्माचरण विसरले. एकमेकांना फसवून स्वार्थ साधण्यात प्रत्येक जण स्वतःला धन्य समजू लागला. विवेकाची आणि त्यांची फारकतच झाल्याचे सध्या दिसते. एखाद्या कार्यालयातून काम करून घेण्यास तेथील संबंधितांना वेगवेगळी आमिषे दाखवून ती करून घेतली जातात. त्या कार्यालयातील लोकही थोड्याशा पैशासाठी अयोग्य कृती करू धजावतात. त्या वेळी ‘आपण अयोग्य आणि चुकीची कृती करत आहोत’, हा सारासार विचार त्यांच्या डोक्यात शिरत नाही. त्यांना लाचरूपात दिला जाणारा पैसा किंवा अन्य आमीष तेवढेच दिसते. त्यांची बुद्धी काम करत नाही. विवेकाला स्वार्थाच्या पडद्याने झाकले जाते. या सर्वांवर योग्य उपाय, म्हणजे समाजात धर्माचरण शिकवणे. सर्वांनी धर्माचरणाच्या कृती दैनंदिन जीवनात केल्यास त्यांना देवाचे चैतन्य मिळेल आणि त्यांची विवेकबुद्धी कार्यरत राहून नैतिकता वाढेल, निर्णयक्षमता वाढेल आणि समाजव्यवस्था सुरळीत चालेल.
– श्री. अशोक लिमकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.