साधिकेच्या जीवनातील प्रतिकूल प्रसंगांत पदोपदी तिची काळजी घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधनेस झालेला प्रारंभ

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१ अ. प्रतिकूल परिस्थितीत असतांना साईबाबांचे भजन ऐकून संत सेवेचा विचार मनात येणे : ‘एक दिवस घरात घडलेल्या एका गंभीर प्रसंगामुळे मी व्यथित अंतःकरणाने बसले होते. त्या वेळी आमच्या घराशेजारच्या साईमंदिरात लागलेल्या भजनातील ‘हम भी अगर वहां होते, तो हम भी सेवा करते ।’ ही ओळ मला ऐकू आली. भजनातील ती ओळ ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘खरंच आता साईबाबा असते, तर मीही त्यांच्याकडे सेवेला गेले असते’; परंतु ‘आता साईबाबांसारखे संत या जगात असतील कि नाही ?’, याविषयी मला काहीच ठाऊक नव्हते.

१ आ. ‘सुखी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व’ या विषयावरील अभ्यासवर्ग ऐकल्यानंतर सत्संगाला जाणे आणि सेवा करू लागणे : एक दिवस मी दैनिक लोकसत्ता वाचत होते. त्यामध्ये ‘सुखी जीवनासाठी अध्यात्माचे महत्त्व जाणून घ्यायचे असेल आणि चांगला साधक व्हायचे असेल, तर पुढील पत्त्यावर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत यावे’, अशा आशयाचे वृत्त होते. त्या वृत्तामध्ये मी वक्त्यांचे नाव ‘डॉ. जयंत बाळाजी आठवले’ असल्याचे वाचले. याच्या काही दिवस आधी मी डॉ. आठवले यांच्याकडे मानसोपचारांसाठी गेले होते. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल पुष्कळ आदर निर्माण झाला होता; परंतु त्या वृत्तातील ‘अध्यात्म’ या शब्दाचा अर्थ ठाऊक नसल्याने मी त्याचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मी ज्या लोकांना या शब्दाचा अर्थ विचारला, ते लोक म्हणायचे, ‘आम्हालाही ठाऊक नाही; परंतु देवाबद्दल काहीतरी असते.’ हे ऐकून माझ्या मनात विचार आला, ‘देवाबद्दल सकाळी १० ते संध्याकाळी ५ इतका वेळ काय ऐकायचे ?’ प्रत्यक्षात रविवारी अभ्यासवर्गाला गेल्यावर मला तो अभ्यासवर्ग पुष्कळ आवडला आणि मी तिथे सांगितल्याप्रमाणे बुधवारी सत्संगाला गेले. मला अभ्यासवर्गात आणि सेवेत पुष्कळ आनंद मिळू लागला. पुढे मी प्रत्येक सत्संगाला आणि शनिवारी अन् रविवारी सेवेसाठी जाऊ लागले.

२. साधिकेच्या कुटुंबियांकडून साधनेला होणारा विरोध आणि परात्पर  गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेवर केलेली कृपा

२ अ. सत्संगाला जाणे आणि सेवा करणे यांस कुटुंबियांकडून विरोध होणे : माझ्या कुटुंबियांना माझे सत्संग आणि सेवा यांसाठी जाणे अजिबात आवडले नाही. त्यांचा मला अतिशय विरोध होऊ लागला. ते मला म्हणायचे, ‘घरचं खाऊन लष्कराच्या भाकर्‍या भाजायला जातेस. संत रामदासस्वामींनीही सांगितले आहे, ‘आधी प्रपंच करावा नेटका । मग घ्यावें परमार्थविवेका ।। (दासबोध, दशक बारावा, समास पहिला, ओवी १) मात्र मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सेवेला जात राहिले.

२ आ. कुटुंबियांनी पोलिसांत खोटे गार्‍हाणे प्रविष्ट (दाखल) करणे; परंतु साधक समवेत असल्याने त्यांनी अटक न करणे : एकदा माझ्या कुटुंबियांनी माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात खोटे गार्‍हाणे प्रविष्ट केले. त्या वेळी मी सनातन संस्थेच्या मुंबईतील सेवाकेंद्रात होते. पोलीस मला पोलीस चौकीत न्यायला सेवाकेंद्रात आले. त्या वेळी परात्पर  गुरु डॉ. आठवले यांनी माझ्या समवेत श्री. शिवाजी वटकर यांना (आताचे सनातन संस्थेचे १०२ वे संत पू. शिवाजी वटकरकाका यांना) पोलीस ठाण्यात पाठवले. पू. वटकरकाका समवेत असल्यामुळे पोलिसांनी मला शारीरिक त्रास दिला नाही किंवा अटक केली नाही.

२ इ. साधिकेची मानसिक स्थिती वाईट असल्याने परात्पर  गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना छायाचित्रांच्या वर्गीकरणाची सेवा देणे : त्या दिवशी पोलीस चौकीतून सेवाकेंद्रात परत आल्यावर पू. वटकरकाका यांनी मला बुद्धीने करायची एक सेवा करण्यास सांगितली. तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘ही सेवा करण्यापेक्षा तुम्ही छायाचित्रांचे वर्गीकरण करण्याची सेवा करा. ती तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येईल.’’ तेव्हा माझी मानसिक स्थिती इतकी वाईट होती की, मी एकाग्रतेने बुद्धीची सेवा करूच शकले नसते.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेच्या प्रारब्धातील प्रतिकूल योग ओळखून त्यावर मात करण्यासाठी साहाय्य करणे

३ अ. गुरुदेवांनी घराविषयी चौकशी करून त्यासंदर्भात अधिवक्त्यांना भेटण्यास सांगणे : एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘तुमचे घर कुणाच्या नावावर आहे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘पैसे माझे आहेत; पण नाव भावाचे आहे.’’ त्यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही अधिवक्त्याकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्या.’’ मी अधिवक्त्याकडे जाऊन त्याबद्दल विचारणा केली असता अधिवक्ता मला म्हणाले, ‘‘वडिलांच्या निधनानंतर तुम्ही सगळीकडे ‘ना हरकत’च्या स्वाक्षरी केल्यामुळे आता तुम्ही काही करू शकत नाही.’’ हे ऐकून मी तो विषय सोडून दिला. घरी माझा मुलगा मला म्हणायचा, ‘‘थांब ! २ मासांनी घराशेजारी असलेल्या मशिदीसमोर तुला भीक मागायला बसवीन.’’ मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हते.

३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला पुन्हा अधिवक्त्यांकडे पाठवणे : एके दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला पुन्हा विचारले, ‘‘काय झाले घराचे ?’’ मी त्यांना अधिवक्त्यांनी सांगितलेला सर्व वृत्तांत सांगितला. ते ऐकून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव मला म्हणाले, ‘‘तुम्ही पुन्हा अधिवक्त्याकडे जा.’’ मी पुन्हा अधिवक्त्याकडे गेल्यावर ते म्हणाले, ‘‘आपण केवळ स्थगनादेश (स्टे ऑर्डर) आणू शकतो.’’

३ इ. साधिकेची आई साधिकेच्या मुलाच्या नावावर घर करणार असल्याचे शेजार्‍याच्या सांगण्यावरून तिच्या लक्षात येणे : काही दिवसांनी आमच्या शेजारच्या सदनिकेत रहाणारा घर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा शेजारी मला म्हणाला, ‘‘तुमची आई आणि मुलगा बाहेरच्या ‘एजंट’ला घेऊन आले होते. तुम्ही घर विकणार आहात का ? विकणार असाल, तर मी तुमचे घर विकून देतो.’’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘२ मासांनी माझ्या मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यावर माझी आई घर त्याच्या नावावर करणार होती.’ असे झाले असते, तर मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नव्हता; कारण नवीन घर घेण्याएवढे पैसे माझ्याकडे नव्हते.

४. कृतज्ञता

वेळो वेळी प्रत्येक संकटातून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला अलगद बाहेर काढले आहे. त्यांना अपेक्षित अशी साधना मी करत नसतांनाही त्यांनी मला आश्रमात ठेवले आहे, त्याबद्दल त्यांच्या सुकुमार कोमल चरणी कोटीशः शिरसाष्टांग नमस्कार आणि कृतज्ञता !’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक