Pakistani Goats Entered Indian Border : भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरील तारेचे कुंपण पाकिस्तानी नागरिकांनी २५ मीटरपर्यंत कापले !
दीडशेहून अधिक शेळ्यांनी केला भारतीय हद्दीत प्रवेश !
नवी देहली – भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर भारतीय हद्दीत असलेल्या ‘सिंगल लाईन’ सुरक्षा तारेचे कुंपण पाकिस्तानी लोकांनी २५ मीटरपर्यंत नुकतेच कापल्याचे आढळून आले आहे. येथून पाकिस्तानातील दीडशेहून अधिक शेळ्यांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश केला. (या शेळ्या भारतीय हद्दीत का पाठवल्या गेल्या ? यामागे काही षड्यंत्र होते का ?, याचीही चौकशी व्हायला हवी ! – संपादक) या शेळ्यांना सीमा सुरक्षा दलाने कह्यात घेतले आहे. पाक वनाधिकार्याने (रेंजरने) या शेळ्यांना परत घेण्यास नकार दिल्यामुळे गेले दीड महिना सीमा सुरक्षा दल या शेळ्यांची देखरेख करत आहे आणि आता शेळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सीमा सुरक्षादलाने जिल्हाधिकार्यांना पत्र लिहिले आहे.
नियमांनुसार शेळ्यांना एखाद्या स्वयंसेवी संघटनेला देण्याची तरतूद आहे; परंतु जिल्ह्यात कोणतेही पशुधन ठेवण्याची आणि देखरेख करणारी स्वयंसेवी संस्था नसल्यामुळे आता स्थानिक पातळीवर शेळ्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया केली जाईल. तोपर्यंत या शेळ्या सीमा सुरक्षा दलाकडेच रहातील, असे सीमा सुरक्षादलाच्या सूत्रांनी सांगितले.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात कुंपण कापले जाते, याचा अर्थ तेथील सुरक्षा व्यवस्थेत गलथानपणा आहे, असे समजायचे का ? |