Rafale Jet Deal : फ्रान्ससमवेतचा ८० राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला रहित !
टेलिग्रामचे संस्थापक डुरोव यांच्या अटकेमुळे अप्रसन्न संयुक्त अरब अमिरातचा निर्णय
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – फ्रान्समध्ये टेलिग्रामचे सीईओ पावेल डुरोव यांच्या अटकेनंतर संयुक्त अरब अमिरातने फ्रान्सकडून ८० राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार रहितत केला आहे. संयुक्त अरब अमिरातने ८० राफेल विमाने खरेदी करण्यासाठी वर्ष २०२१ मध्ये फ्रेंच आस्थापन ‘दसॉल्ट’शी करार केला होता. ही विमाने वर्ष २०२७ पर्यंत मिळणार होती. डुरोव यांच्या अटकेमुळे आता संयुक्त अरब अमिरात फ्रान्ससमवेतचे सर्व प्रकारचे सैनिकी आणि तांत्रिक सहकार्य संपवण्याचा विचार करत आहे. डुरोव यांचा जन्म रशियामध्ये झाला आहे, तर त्यांच्याकडे फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांचे नागरिकत्व आहे. डुरोव यांच्यावर बाल लैंगिक शोषण सामग्रीची देवाणघेवाण करणे, अमली पदार्थांची तस्करी करणे आणि संघटित गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासाठी टेलिग्रामचा वापर करणे, असे आरोप आहेत.
१. संयुक्त अरब अमिरातच्या परराष्ट्र मंत्रालयाने डुरोव यांना कायदेविषयक साहाय्य देण्यासाठी फ्रेंच अधिकार्यांशीही संपर्क साधला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही डुरोव यांच्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करत आहोत. आमच्या नागरिकांची सुरक्षा आणि त्यांच्या हितांचे रक्षण करणे, हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
२. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव म्हणाले की, डुरोव यांच्या अटकेनंतर रशिया आणि फ्रान्स यांच्यातील संबंध सर्वकालीन खालच्या पातळीवर पोचले आहेत. फ्रान्सने फार गंभीर आरोप केले आहेत, जे सिद्ध करण्यासाठी तितकेच सक्षम पुरावेदेखील आवश्यक आहेत.