डोंबिवलीत ७ जुनी झाडे तोडल्यावर संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस !
डोंबिवली – पश्चिमेतील गरीबाचा पाडा येथील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जलकुंभाजवळील मुख्य वाटेवरील आणि गृह प्रकल्प उभारणी चालू असलेल्या प्रकल्प जागेतील ७ जुनी झाडे तोडल्याप्रकरणी पालिकेच्या उद्यान विभागाने ‘विघ्नहर्ता पार्क’चे आशीष मुंडे यांना ७ दिवसांत खुलासा करण्याची नोटीस बजावली आहे.
मुख्य उद्यान अधीक्षक जाधव यांच्या आदेशावरून प्रशासनाने ही नोटीस बजावली आहे. ही ७ झाडे यंत्राच्या साहाय्याने बुडासकट तोडून टाकण्यात आली आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. संबंधित जागेतील झाडे तोडण्यास उद्यान विभागाने कुणालाही अनुमती दिली नव्हती.
सीसीटीव्हीत एक टेम्पो तोडलेल्या झाडांची वाहतूक करत असल्याचे दिसत असून वाहन क्रमांकावर माती फासण्यात आली होती. झाडे तोडलेल्या भागात ‘विघ्नहर्ता पार्क’ विकासकाचा गृहप्रकल्प चालू आहे.
१ झाड तोडल्यानंतर पालिका त्या बदल्यात २५ झाडे लावणे आणि जगवणे याची हमी संबंधितांना देते.