भारतीय तत्त्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पुनर्जन्म विचार !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
२८ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवे शरीर आणि पाप-पुण्य कर्म, कर्मफळ केवळ मनुष्यालाच असणे अन् पशू-पक्ष्यांचा जन्म म्हणजे भोगजन्म असल्याने त्यांना कर्मफळ नसणे, ७ प्रकारच्या गती, तसेच मनुष्यजन्म आणि संत’ यांविषयीचे लिखाण वाचले. आज ‘याच जन्मात पाप-पुण्याची फळे भोगावी लागतात का ?’ यातील पुढील लिखाण प्रसिद्ध करत आहोत.
(लेखांक ४२)
लेखांक क्र. ४१ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/829048.html
६. याच जन्मात पाप-पुण्याची फळे भोगावी लागतात का ?
६ आ. सुजनांना पूर्वजन्मीचे देणे फेडावे लागणे आणि दुष्ट लोक आता जरी चैनीत असले, तरी पुढील जन्मी त्यांना त्याचे फळ भोगावे लागणार असणे : या प्रश्नाचा उलगडा एकाच विचाराने सहज होऊ शकतो. तो विचार म्हणजे सुजन असूनही जो दुःखे भोगत आहे, तो पूर्वजन्मीचे देणे फेडत आहे आणि दुर्जन असूनही ज्याला शिक्षा होत नाही, उलट तो चैनीत रहातो, त्याला हे फळ पुढील जन्मात भोगायचे आहे; कारण काहीही दोष नसतांना दुःख का भोगायला लागावीत ? कुणी राजपुत्र होतो, तर कुणी भिकारणीचे मूल होते !
६ इ. अकृत अभ्यागम दोष !
शंकराचार्य म्हणतात,
यथा जातमात्रेण राजपुत्रेण सुखमुपभुज्यते न तथा दरिद्रस्य पुत्रेणेति वैषम्यं दृश्यते ।
यदि जन्मान्तरं नास्ति तर्र्ह्येतद् दृश्यमानं वैषम्यमकारणमेव स्वीकर्तव्यं भवेत् ।
अयमकृताभ्यागमदोषः ।
अर्थ : ज्याप्रमाणे नवजात राजपुत्राला सुख उपभोगायला मिळते, तसे दरिद्र्याच्या अपत्याला मिळत नाही. जर पुनर्जन्म मानलाच नाही, तर हे स्पष्ट दिसणारे वैषम्य अकारणच आहे, असे मानावे लागेल. हा तर अकृत अभ्यागम (म्हणजे न केलेल्या कर्माची फळे भोगावी लागणे) दोष आहे.
७. प्रत्येक कर्माला भलेबुरे फळ असणे आणि ते वर्तमान किंवा पुढील जन्मात भोगावे लागणार असणे
तर्कशास्त्राच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीला कारण असते. उगाच काहीच होत नाही. मग श्रीमंताकडे जन्माला येणार्या बालकाने या जन्मात तर अजून काहीच केले नाही, तरी त्याला ऐश्वर्य आणि त्या बिचार्या गरीब बालकाने अजून काहीच दुष्कृत्य केलेले नाही, तरी त्याला दारिद्र्य !
जी माणसे नानविध कुकर्मे करून ऐषारामात रहातात, त्यांनी केलेल्या पापांचे काय झाले ? हा दुसरा दोष आहे. याला ‘कृतप्रणाश’ असे म्हणतात. अर्थात् हे दोन्ही दोष या विश्वात भासमान असले, तरी प्रत्यक्ष खरे नाहीत; कारण केलेल्या प्रत्येक कर्माला भलेबुरे फळ असतेच. केवळ कर्ता जीव असल्यामुळे आणि तो केवळ याच शरिरापुरता नसल्याने त्याला जन्मजन्मांतरी मिळणारी शिक्षा दिसून येत नाही.
८. अनेकांना पूर्वजन्मीची देणी चुकवावी लागणे
दोन माणसे प्रत्येक महिन्याला अधिकोशात (बँकेत) बरोबर जातात आणि दोघेही प्रतिमास १ सहस्र जमा करतात, तर ३ वर्षांनी त्यांच्या खात्यांत किती रक्कम जमा होईल ? ३६ सहस्र रुपये + व्याज एवढी रक्कम जमा व्हायला हवी. एकाच्या खात्यात तेवढी जमा झाली; पण दुसर्याच्या खात्यात मात्र काहीही ठेव जमा नव्हती; कारण पहिला सेव्हिंग (बचत) करत होता; पण दुसरा मात्र कर्जाचा हप्ता फेडत होता. तेव्हा त्याचे सुमारे २५ सहस्र रुपयांचे कर्ज व्याजासह फिटले. आपल्यापैकी बरेच लोक कर्जाचे हप्तेच फेडत असतात, म्हणजेच पूर्वजन्मीची देणी चुकवत असतात.
९. प्रत्येक जन्मी जिवात्मा तोच असणे; पण देह भिन्न असणे
यात एक गोष्ट मात्र देवाने बरी केली आहे की, मृत्यूनंतर अन्य देहप्राप्ती झाल्यावर मागचे काहीच आठवत नाही, वस्तूतः जिवात्मा तोच असतो; पण देह भिन्न असतो, जशी एखादी युवती लग्न होऊन नव्या घरात जाते, तिचे नाव आणि आडनाव पालटते. ‘कु.’ची ‘सौ.’ होते. वयोमानाने रूप-रंगही पालटतो. प्रौढत्वामुळे वेशभूषाही पालटते, तशी ती सर्वांगानेच परिवर्तित होते; पण ती माहेर किंवा बालपण विसरत नाही; कारण तिचा देह तोच असतो. त्यामुळे स्मृती केवळ या जन्माचीच असते. तथापि अपवादात्मक, काही व्यक्तींची, काही वेळेला पूर्वस्मृती जागृत होते. अशी काही उदाहरणे आहेत की, ज्यांना आपला पूर्वजन्म, पूर्वीचे घर, पूर्वजन्मीचे आई-वडील इत्यादी आठवले आणि त्या मुलांनी ते नेऊन दाखवलेसुद्धा; पण हे अपवादच !
(क्रमशः)
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई. (साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)