नम्र आणि गुरुसेवा तळमळीने करणार्या फोंडा, गोवा येथील सौ. विद्या शानभाग (वय ४१ वर्षे) !
‘श्रावण कृष्ण एकादशी (२९.८.२०२४) या दिवशी सौ. विद्या विनायक शानभाग (पूर्वाश्रमीच्या कु. शिल्पा करी) यांचा ४१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहे.
सौ. विद्या विनायक शानभाग यांना ४१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. लहानपणापासून देव, गुरु आाणि नामस्मरण यांविषयी आवड असणे
‘कु. शिल्पा प्राथमिक शाळेत असतांना अधून मधून रुग्णाईत असे. तिला ताप आला की, मी तिला संतचरित्र आणि पौराणिक कथा वाचून दाखवत असे, तसेच मी गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि प्रवचने वाचत असे. शिल्पा ते अत्यंत आवडीने ऐकत असे. ती ‘श्रीराम जय राम जयजय राम ।’ हा नामजप पुष्कळ वेळ करत असे.
२. शिल्पा लहानपणापासूनच शांत आणि स्थिर आहे.
३. ती सर्वांशी नम्रतेने वागते.
४. व्यवस्थितपणा
तिचे घरातील प्रत्येक काम सुव्यवस्थित आणि नीटनेटके आहे. ती वस्तू अतिशय हळूवारपणे हाताळते.
५. साधी राहणी
ती घरी, आश्रमात आणि बाहेरगावीही साधेपणाने रहाते. ती नातेवाइकांच्या लग्नसमारंभाला गेल्यासही थोडे आणि सात्त्विक अलंकार घालते.
६. सेवेला प्राधान्य देणे
आमचे बरेच नातेवाईक सहलीला बाहेरगावी जातात; पण शिल्पाला मनोरंजनासाठी प्रवास करायला आवडत नाही. आम्ही कधी कधी माझ्या आईकडे (पू. सीताबाई जोशी (सनातनच्या १०० व्या संत) यांच्याकडे), किंवा नातेवाइकांच्या कार्यक्रमाला जातो. शिल्पा कुठेही गेली, तरी तिथे ती अल्प कालावधीसाठी रहाते. तिचे लक्ष सतत सेवेकडे असते.
७. गुरुंप्रती दृढ श्रद्धा
ऑक्टोबर १९९९ पासून मी आणि शिल्पा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्हा शिल्पा माध्यमिक शाळेत जात होती. तिच्या शाळेला सुटी असतांना ती माझ्या समवेत सत्संगाला आणि सेवेला येत असे. सत्संगात सांगितलेले ‘गुरु आणि साधना’ यांचे महत्त्व ऐकून तिच्या मनात गुरुंप्रती भक्ती निर्माण झाली. तेव्हापासून ती ग्रंथप्रदर्शन, शिबिर, तसेच अन्य कार्यक्रम या ठिकाणी सेवा करण्यासाठी तिचा अभ्यास करून झाल्यानंतर येत असे. ती महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना बाहेरगावी जाऊन साधकांसाठी स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेत असे. ती गुरूंनी सांगितल्यानुसार अष्टांग साधना करत होती. तिची अभियांत्रिकीची परीक्षा झाल्यानंतर तिला बेंगळुरू येथील एका मोठ्या आस्थापनात अभियंता म्हणून नोकरी मिळाली; मात्र तिने गुरुंप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर पूर्णवेळ साधना करण्यासाठी नोकरी सोडली.
८. गुरुसेवेची तीव्र ओढ
ती प्रत्येक सेवा मनापासून करते. तिने घरी स्वच्छतेची सेवा केल्यावर ती विश्रांतीसाठी न थांबता आश्रमात जाऊन सेवा करते. ती म्हणते, ‘‘मी आश्रमात जाऊन सेवा केली नाही, तर माझ्या मनाला समाधान मिळणार नाही.’’
‘गुरुदेवांच्या कृपेने मला अशी गुणी आणि सात्त्विक मुलगी लाभली. गुरुदेवांनी मला ही सूत्रे सुचवली आणि त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतली’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– श्रीमती मीरा करी (सौ. विद्या यांची आई, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६६ वर्षे), फोंडा, गोवा. (१२.८.२०२४)