हिंदु संस्कृतीचे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल ! – स्वप्नील कुसाळे, ऑलिंपिक विजेता
पिंपरी चिंचवड (जिल्हा पुणे) – पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. हिंदु संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण ‘जय श्रीराम’ म्हणतो, घोषणा देतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदु संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदु राष्ट्र आणखी मोठे होईल. आपले हिंदु राष्ट्र पुढे गेले पाहिजे. ते वाढले पाहिजे. ‘जय श्रीराम’ म्हणून हिंदु संस्कृतीचे भक्कमपणे रक्षण केले, तरच हिंदु राष्ट्र मोठे होईल, असे आवाहन ऑलिंपिक कांस्यपदक विजेते नेमबाज स्वप्नील कुसाळे यांनी केले. स्वप्नील कुसाळे हे बालेवाडी-हिंजवडीतील अमोल बालवडकर यांच्या दहीहंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या वेळी स्वप्नील यांचा नागरी सत्कार करून त्यांना ५ लाख रुपये देण्यात आले.
स्वप्नील कुसाळे पुढे म्हणाले की, दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची आहे. उंचावर जाऊन हंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्यामागे मेहनत असते. तरुणांनी चांगला आहार घेतला पाहिजे. बाहेरचे खाऊ नये. घरातील जेवण करावे, वेळेत आणि पौष्टिक खावे. आपले आरोग्य जपा, तरच हिंदु राष्ट्र निर्मितीचं स्वप्न पूर्ण होईल.