सद्गुरु राजेंद्र शिंदे धर्मप्रचारासाठी रुग्णालयांसारख्या रज-तम अधिक असलेल्या ठिकाणी गेल्यावर त्यांना झालेले त्रास !

‘समष्टी साधना म्हणून धर्मप्रचार करतांना साधकांना विविध ठिकाणी जाऊन भेटणे, समाजातील व्यक्तींना संपर्क करणे, प्रवचन करणे, मार्गदर्शन करणे इत्यादी प्रकारच्या सेवा असतात. हे कार्य करत असतांना अनेक वेळा साधकांना अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांना सामोरे जावे लागते; परंतु साधक न डगमगता अशा प्रसंगांना गुरुकृपेने सामोरे जात असतात. मी अनुभवलेले असे काही प्रसंग पुढे दिले आहेत.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

१. एका मनोरुग्णालयात गेल्यावर झालेले त्रास

१ अ. रुग्णालयात गेल्यापासून त्रास जाणवणे आणि आरती चालू असतांना अधिकच त्रास जाणवू लागणे : वर्ष २००१ मध्ये एका मनोरुग्णालयात गणेशोत्सवाच्या कालावधीत सनातन संस्थेचे प्रवचन ठेवले होते. आम्ही दिलेल्या वेळेत तेथे पोचलो. तेव्हा ‘कार्यक्रम चालू होण्यास अजून काही वेळ लागणार आहे’, असे आमच्या लक्षात आले. ‘थोड्याच वेळात तेथे गणपतीची आरती चालू होणार होती. त्यानंतर आमचे प्रवचन असेल’, असे आयोजकांनी सांगितले; म्हणून आम्ही सर्व आरतीला उभे राहिलो. रुग्णालयात गेल्यापासूनच आम्हाला त्रासदायक स्पंदने जाणवत होती. आरती चालू असतांना आम्हाला अधिकच त्रास जाणवू लागला.

१ आ. प्रवचनाला वेळ असल्याने आणि साधकांना तेथील त्रासदायक स्पंदनांचा त्रास होत असल्याने प्रवचन रहित करणे : आरती झाल्यावर आयोजकांनी सांगितले, ‘‘आता दुसरा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर तुमचे प्रवचन असेल.’’ तेव्हा ‘आता थांबावे लागेल, तर कसे करावे ?’ याचा आम्ही विचार करत होतो. आम्हा सर्वांनाच त्रास होत होता. कुणाच्या छातीवर दाब जाणवत होता, कुणाचे डोके दुखत होते, तर कुणाला अस्वस्थ वाटत होते. ‘तेथे थांबू नये’, असे आम्हा सर्वांना वाटत होते. कार्यक्रम चालू व्हायला अजून एक घंटा अवकाश होता. त्या स्थितीत आम्हाला तेथे थांबणे अवघड जात होते; म्हणून आम्ही आयोजकांना सांगून आमचा प्रवचनाचा कार्यक्रम रहित केला.

१ इ. आरतीच्या वेळी रुग्णालयातील कर्मचारी भावपूर्ण आणि योग्य तालासुरात आरती म्हणत नसल्याने त्रासदायक स्पंदने निर्माण होऊन त्रास होणे : ‘रुग्णालयात आरती चालू झाल्यावर आम्हाला त्रास का झाला असावा ?’ याचा अभ्यास करतांना माझ्या असे लक्षात आले की, ‘आरती तालासुरात आणि भावपूर्ण आवाजात म्हटल्यावर तेथे देवतांचे तत्त्व आकर्षित होते आणि त्यामुळे वातावरण चैतन्यमय होते; परंतु आरती बेसूर आवाजात म्हटली गेल्यास तेथे त्रासदायक स्पंदने निर्माण होऊन अनिष्ट शक्ती आकृष्ट होतात.’ या तत्त्वानुसार रुग्णालयातील कर्मचारी म्हणत असलेली आरती भावपूर्ण स्वरात नव्हती, तसेच ती योग्य तालासुरातही नसल्याने त्या आरतीतून त्रासदायक स्पंदने निर्माण होत होती. त्यामुळे आम्हाला आरतीच्या वेळी त्रास झाला.

१ ई. मनोरुग्णांना बरे करण्यासाठी आध्यात्मिक उपायांची आवश्यकता असणे : मनोरुग्णांना लवकर ठीक करायचे असेल, तर त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे. नामजप करणे, नियमित वास्तूशुद्धी करणे, वास्तूत देवतांचे नामजप चालू ठेवणे, नामपट्ट्यांचे छत लावणे, प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांच्या आवाजातील भजने लावून ठेवणे इत्यादी उपाय केल्यास अशा व्यक्तींचा त्रास लवकर उणावू शकतो.

२. रायगड जिल्ह्यातील एका रुग्णालयात मार्गदर्शनासाठी गेल्यावर झालेला त्रास

२ अ. मार्गदर्शन असलेल्या रुग्णालयातील खोलीत दाब जाणवणे आणि साधकांनी एकत्रित नामजप केल्यावर बरे वाटणे : वर्ष २००४ मध्ये रायगड जिल्ह्यात सेवा करतांना एकदा जिल्ह्यातील साधकांसाठी एका रुग्णालयातील एका खोलीत माझे मार्गदर्शन ठेवले होते. कार्यक्रमस्थळी पोचल्यावर आम्हाला तेथे पुष्कळ दाब जाणवू लागला; म्हणून उपस्थित सर्व साधकांनी थोडा वेळ एकत्रित जप केला. तेव्हा आम्हा सर्वांना थोडे बरे वाटले.

२ आ. साधकांसमोर विषय मांडतांना विविध त्रास होणे आणि विश्रांती घेऊन नामजप केल्यावर बरे वाटणे : नंतर तेथे साधकांसमोर विषय मांडतांना मला अस्वस्थ वाटणे, डोके गरगरणे, मळमळणे, असे त्रास चालू झाले. असे असूनही गुरुदेवांच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) कृपेने मार्गदर्शन पूर्ण झाले. त्यानंतर मात्र मला तेथेच उलट्या होऊ लागल्या. तेथून आम्ही एका साधिकेच्या घरी गेलो. तेथे मी थोडी विश्रांती घेतली आणि नामजप केला. तेव्हा मला थोडे बरे वाटले.

३. वरील दोन्ही प्रसंगांत शिकायला मिळालेली सूत्रे

अ. मनोरुग्णालयातील प्रसंगातून लक्षात आले की, समाजातील मनोरुग्णांना प्रत्यक्षात अनिष्ट शक्तींचा तीव्र त्रास असतो. त्यामुळे अशा रुग्णालयात पुष्कळ त्रासदायक स्पंदने जाणवतात.

आ. मनोरुग्णालय आणि रायगड येथील एक रुग्णालय या दोन्ही ठिकाणी असे लक्षात आले, ‘सनातनचे साधक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतात. साधनेमुळे साधकांमधील सकारात्मकता वाढून त्यांच्यातील चैतन्यही वाढते. साधक एकत्र येतात, तेव्हा सत्संगामुळे तेथे अधिक प्रमाणात दैवी तत्त्व कार्यरत होते. त्यामुळे तेथील वातावरण सकारात्मक होऊन सत्संगातून दैवी स्पंदने प्रक्षेपित होतात.’

इ. रुग्णालयासारख्या रज-तमात्मक स्पंदनांनी भारित झालेल्या ठिकाणी अनिष्ट शक्तींचे वास्तव्य असते. साधकांच्या सत्संगामुळे निर्माण होणारी चैतन्यदायी स्पंदने वाईट शक्तींना नको असतात. याचा त्यांना त्रास होतो; म्हणून अशा कार्यक्रमांना त्या विरोध करतात.

४. मुंबईतील एका रुग्णालयात झालेला त्रास 

वर्ष २००४ मध्ये एकदा मी आणि एक साधक मुंबईतील एका रुग्णालयात भरती असलेल्या एका साधिकेला भेटायला गेलो होतो. रुग्णालयात गेल्यावर लगेचच आम्हाला तेथे दाब जाणवू लागला. साधारण ५ ते ७ मिनिटांतच माझ्या समवेत असलेल्या साधकाला त्रास होऊ लागला. त्याला होणार्‍या त्रासाची तीव्रती इतकी अधिक होती की, तो धावतच रुग्णालयाच्या बाहेर गेला. बाहेर आल्यावर तो म्हणाला, ‘‘तेथे अनिष्ट शक्तींची आक्रमणे होत होती. मी ती सहन करू शकलो नाही; म्हणून धावतच बाहेर आलो.’’

५. रुग्णालयाच्या ठिकाणी गेल्यावर अधिक प्रमाणात त्रास होण्यामागील कारणे आणि त्यावरील उपाय

५ अ. रुग्णांकडून येणारी रज-तमात्मक स्पंदने आणि अस्वच्छता यांमुळे तेथील वातावरण रज-तमात्मक होऊन त्रास होणे : रुग्णालयामध्ये आलेले रुग्ण हे दुःखी-कष्टी असतात. त्यामुळे त्यांच्याकडून वातावरणात रज-तमात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात, तसेच शासकीय रुग्णालयांत पुष्कळ प्रमाणात अस्वच्छता होती. सर्वत्र अव्यवस्थितपणा दिसत होता. या सर्वांचा परिणाम, म्हणजे तेथील वातावरण पुष्कळ रज-तमात्मक झाले होते.

५ आ. रुग्णालयात सात्त्विक वातावरण निर्माण करणे आवश्यक ! : अशा रुग्णालयांमध्ये तेथील व्यवस्थापनाने स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवण्यासमवेतच रुग्णालयातील वातावरण सात्त्विक ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. रुग्णालयांमध्ये नामजप करणे, नियमित वास्तूशुद्धी करणे, वास्तूत भ्रमणभाषवर देवतांचे नामजप चालू ठेवणे, नामपट्ट्यांचे छत लावणे, प.पू. भक्तराज महाराज यांच्यासारख्या उच्च कोटीच्या संतांच्या आवाजातील भजने लावून ठेवणे इत्यादी उपाय केल्यास रुग्णालयातील वातावरण सात्त्विक राहील आणि आध्यात्मिक त्रास जाणवणार नाही.

सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले विचार कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण करतो.’
इदं न मम ।
– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.७.२०२३)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.