परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
२८ ऑगस्ट २०२२ या दिवशी झालेल्या रथोत्सवाच्या आधी आणि रथोत्सव चालू होतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीविष्णुरूपात रथारूढ पाहिल्यावर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या. या भागात प्रत्यक्ष रथोत्सवाच्या वेळी नृत्य करतांना तिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.
(भाग २)
भाग १. वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/828947.html
४. प्रत्यक्ष श्रीमन्नारायण आणि साक्षात् महालक्ष्मी यांच्यासमोर नृत्य करतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
४ अ. सर्वप्रथम नारायणस्वरूप गुरुमाऊलींसमोर ‘जय जनार्दना कृष्णा राधिका पते’ या भक्तीगीतावर नृत्य सादर करणे
१. मला संपूर्ण जगाताचा विसर पडून ‘मी केवळ नारायणासाठीच हे नृत्य करत असून ‘ते नारायणाला आवडायला हवे’, एवढाच विचार माझ्या मनात येत होता.
२. रथोत्सवात मार्गावर नृत्य करतांना ऊन लागत होते आणि पायाला चटके बसत होते; परंतु श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांचे आमच्यावर अखंड कृपाछत्र असल्यामुळे आम्हाला नृत्य करतांना ऊन किंवा चटके यांची फारशी जाणीव होत नव्हती.
३. गुरुदेवांसमोर नृत्यातील एक मुद्रा करतांना मला ‘वैकुंठलोकाचे दर्शन झाले. माझ्या डोळ्यांसमोर दिव्य पांढरा प्रकाश आला आणि माझ्या तोंडात आपोआप गोड लाळ निर्माण झाली.
४. ‘नृत्य करतांना आम्ही पृथ्वीवर नृत्य करत नसून वैकुंठलोकात नृत्य करत आहोत आणि ते नृत्य हवेत किंवा ढगांमध्ये होत आहे’, असे मला जाणवले.
५. पदाघात करतांना मला त्याची संवेदनाही जाणवत नव्हती. नृत्य संपल्यावर आम्ही गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला, तेव्हा मला ‘निर्विचार स्थिती’ अनुभवता आली. नंतर अखंड कृतज्ञता व्यक्त होत होती.
४ आ. ‘नारायणम् भजे नारायणम्’, या गीतावर नृत्य सादर करतांना जाणवलेली सूत्रे
१. हे नृत्य करतांनाही मला स्वतःचे अस्तित्व जाणवत नव्हते. हे नृत्य चैतन्याच्या स्तरावर झाले.
२. आम्ही एका कमळावर नृत्य करत असून सर्वत्र चैतन्याची वलये कार्यरत झाली होती.
३. नृत्य करतांना अनाहतचक्रावर चांगल्या संवेदना जाणवल्या.
४. हे नृत्य करतांना गुरुदेव पुष्कळ मोठे दिसत होते आणि आम्ही लहान दिसत होतो.
४ इ. ‘श्रीमन्नारायण नारायण हरि हरि’ या गीतावर ‘टिपरी नृत्य’ सादर करतांना जाणवलेली सूत्रे : आम्ही टिपरी नृत्य करतांना एक वासरू आमच्या अगदी जवळून गेले. त्या वासराला पाहून मला पुष्कळ आनंद झाला. ‘आम्ही हे टिपरी नृत्य साक्षात् गोकुळात करत असून श्रीकृष्णाचा सर्वाेत्तम भक्त असलेल्या वासराने आमच्याजवळ येऊन आम्हाला आशीर्वाद दिला. टिपरी नृत्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात भाव आणि आनंद यांच्या लहरींचे प्रक्षेपण झाले आणि तो आनंद ‘दैवी’ होता’, असे मला जाणवले.
५. ‘रथोत्सवात चालतांना वेळेचे भान न रहाणे आणि प्रत्येक पाऊल साक्षात् वैकुंठलोकाच्या दिशेनेच पडत आहे’, अशी अनुभूती येणे : परात्पर गुरुदेवांच्या विविध भावमुद्रा आणि त्यांचे प्रत्यक्ष रूप पाहून माझे भावाश्रू अनावर झाले. ‘गुरुदेव आमच्यावर अखंड कृपावर्षाव करत असून त्या शीतल, प्रीतीमय कृपावर्षावामुळे माझा कृतज्ञताभाव अश्रूंच्या माध्यमातून माझ्या डोळ्यांतून वाहून त्यांच्या चरणी समर्पित होत आहे’, असे मला वाटले. रथोत्सवात चालतांना मला वेळेचेही भान राहिले नाही. ‘आम्ही किती वेळ चालत आहोत ? किती वाजले ?’, हे काहीच कळत नव्हते. माझे प्रत्येक पाऊल हे साक्षात् वैकुंठलोकाच्या दिशेनेच पडत आहे’, अशी मला अनुभूती आली. मला माझ्या डोळ्यांसमोर लख्ख पांढरा प्रकाश दिसत होता. नंतर ‘आनंदी आनंद’ अशी स्थिती होती. मी शब्दच विसरून गेले आणि केवळ प्रभु सहवासाच्या मधुरतेत रमून गेले.
हे नारायणा, रथोत्सवाच्या आधीपासून शेवटपर्यंत आणि आताही ती आनंदावस्था टिकून आहे. गुरुदेव, तुम्ही आनंदस्वरूप आहात. हा आगळावेगळा रथोत्सव मी कधीच विसरू शकत नाही.
६. कृतज्ञता
‘रथोत्सवात सादर केलेली सर्व नृत्ये ही साक्षात् श्रीमन्नारायणानेच आमच्याकडून करून घेतली. त्याच्याच चैतन्यामुळे आम्हाला या दिव्य अनुभूती घेता आल्या. ‘हे श्रीमन्नारायणा, तुला अपेक्षित असे नृत्य करायला आम्ही न्यून पडलो, तरी तू आम्हाला विविध अनुभूती देऊन आमच्याकडून हे भावनृत्य करून घेतलेस’, यासाठी मी तुझ्या ब्रह्मांडव्यापी चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते.’ (‘या परिच्छेदाचे टंकलेखन करतांना मला सूक्ष्मातून विविध फुलांचा दैवी गंध येत होता.’ – कु. अपाला)
डोळे मिटले, तरी रथोत्सव दिसावा।
डोळे उघडता, तो सतत अनुभवावा।। १।।
श्रीहरीचे रूप डोळ्यांत साठवतांना।
हृदयमंदिरात क्षण अन् क्षण साजरा व्हावा।। २।।
अशीच तव चरणी आर्त प्रार्थना।
कृतार्थ केले तू गुरुराया या जीवना।। ३।।
कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता गुरुराया !’
– कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (४.६.२०२२)
(समाप्त)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |