President Murmu : अत्याचार विसरण्याची आपली सवय धिक्कारास्पद ! – राष्ट्रपती मुर्मू
कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येचे प्रकरण
नवी देहली – देहलीतील ‘निर्भया’च्या घटनेनंतर (देहलीतील एका युवतीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती, त्या घटनेला निर्भया प्रकरण म्हणतात) १२ वर्षांत समाज बलात्काराच्या घडलेल्या असंख्य घटना विसरला आहे. अशा गोष्टी विसरण्याची ही सामूहिक सवय धिक्कारास्पद आहे. कोलकाता येथील बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे मी निराश अन् घाबरले आहे, असे विधान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकात्यातील राधा गोविंद (आर्.जी.) कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी केले.
राष्ट्रपती पुढे म्हणाल्या,
१. कोणताही सुसंस्कृत समाज आपल्या मुली आणि बहिणी यांच्यावर असे अत्याचार करू देऊ शकत नाही.
२. समाजाने प्रामाणिकपणे आणि निष्पक्षतेने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. अनेकदा घृणास्पद मानसिकता असलेले लोक महिलांना स्वतःहून कमी दर्जाचे समजतात.
३. जो समाज इतिहासाला सामोरे जाण्यास घाबरतो, तोच गोष्टी विसरतो. आता भारताने आपल्या इतिहासाला पूर्णपणे तोंड देण्याची वेळ आली आहे.
४. या विकृतीला आपण एकत्रितपणे सामोरे जाणे आवश्यक आहे, जेणेकरून तिला आरंभीच नष्ट करता येईल.
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर आजपर्यंत आपल्या देशात बलात्कार्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही, त्यामुळेच अशा नराधमांचे फावले आहे, हेही तितकेच सत्य आहे ! |