तासगाव येथील येरळा नदी पुलावरून दांपत्य गेले वाहून !
तासगाव – येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळे वस्ती येथील पुलावरून वृद्ध दांपत्य मोटारसायकलीसह वाहून गेले. रात्री विलंबापर्यंत ‘एन्.डी.आर्.एफ्.’च्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) २ पथकांकडून शोधकार्य चालू होते. हे दांपत्य कोण होते, याची माहिती मिळू शकली नाही. ४ दिवस सलग मुसळधार पाऊस पडल्याने येरळा नदीला पूर आला आहे. त्यामुळे तेव्हापासून वाहतूक बंद होती; मात्र पुलावरील पाणी अल्प होताच काही वाहने ये-जा करत होती. नदीपुलावरून मोटारसायकलीवरून जाऊ नये, असे नागरिकांनी या वृद्ध दांपत्याला सांगूनही ते पुलावरून जाऊ लागले; मात्र पुलाच्या मध्यभागी गेल्यानंतर ते दांपत्य तोल जाऊन पाण्यात पडले आणि वाहून गेले.