गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाण्यासाठी ३ सहस्रांहून अधिक गाड्यांचे आरक्षण !
प्रवाशांची प्रथम पसंती ‘एस्.टी.’ला !
मुंबई – ७ सप्टेंबरला गणेशोत्सव चालू होत असून कोकणात जाण्यासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागांतून प्रवाशांनी प्रथम पसंती ‘एस्.टी.’ला दिली असून २ सहस्र ४३९ गट आरक्षणासह एकूण ३ सहस्र १९६ गाड्यांचे आरक्षण झाले आहे. एस्.टी. महामंडळाने यंदा ३ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ४ सहस्र ३०० अधिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २ सप्टेंबरपासून या गाड्या संबंधित बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव कालावधीत गणेशभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी प्रत्येक बसस्थानक आणि बसथांब्यावर एस्.टी.च्या वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत रहाणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक तैनात करण्यात येणार असून प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत, असे एस्.टी.चे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी कळवले आहे.