भारतीय तत्वज्ञानातील अपूर्व विचार म्हणजे पूर्वजन्म विचार !
पू. प्रा. सु.ग. शेवडे यांची ‘भारतीय संस्कृती’विषयीची लेखमालिका !
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘नवे शरीर आणि पाप-पुण्य कर्म’ यांविषयीचे लिखाण वाचले. आज ‘७ प्रकारच्या गती’ यातील पुढील लिखाण प्रसिद्ध करत आहोत. (लेखांक ४१)
मागील भाग येथे वाचा –https://sanatanprabhat.org/marathi/827224.html
३. ७ प्रकारच्या गती !
३ ई. हीन मनुष्यजन्म : केवळ शरिराने आकार माणसाचा ! बाकी वर्तन क्रूर, घराणे नीच, भोवती हलकट माणसांचा संपर्क, व्यसनांत डुंबलेला, जन्मात देवाचे नावही घेण्याची बुद्धी नाही. उपासना, भक्ती, ज्ञानाचा तर दुरान्वयानेसुद्धा संबंध नाही. जवळजवळ पशूच !
३ उ. श्रेष्ठ पशूजन्म : शरीर पशूचे; पण भाग्य चांगले ! राजाचा हत्ती, श्रीमंताचा कुत्रा, कीर्तीमान पंडिताचा घोडा, धनिकाचे पाळीव मांजर, वनावर आधिपत्य गाजवणारा वनराज, गरुड, हंस इत्यादी. आदरणीय शरीरे आणि भाग्यवान पशुत्व !
३ ऊ. हीन पशूजन्म : पशू-पक्ष्याचा जन्म तर आहेच. तोही दुर्दैवी ! सर्कशीतील वाघ-सिंह, पिंजर्यातील पराधीन पक्षी, माकडे इत्यादी प्राणी, कावळा, गिधाड, घुबड इत्यादी. अमंगल शरिरे आणि दुर्दैवी अभागी जीवन. यातही विष्ठेतील, शेणातील किडे, शरिरांतील गलिच्छ रोगजंतू, जंत (पोटातील जंत), नारू, घाणीतील अळ्या इत्यादी.
३ ए. भूत, पिशाच्च इत्यादी जन्म : जन्म आहे, भोक्तव्य आहे, वासना आहेत; पण शरीर नाही. असे काही जन्म आहेत. या अत्यंत आसुरी योनी होत. आत्यंतिक: पापी जीव या जन्मात जाऊन यातना भोगतात. या एकेका प्रकारात लक्षावधी प्राण्यांच्या जाती मोडतात. मनुष्याला त्याच्या पाप-पुण्यात्मक कर्मानुसार एकच जन्म येतो, असे नाही. असे अनेक जन्म भोगत भोगत शेवटचे भोक्तव्य भोगण्यासाठी तो मनुष्यजन्मात येतो. ८४ लक्ष योनी आहेत. काही पापी व्यक्तींना सहस्रो योनींमध्ये पुनःपुन्हा फिरणारे जन्म घ्यावे लागतात.
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते ।
वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुर्लभः ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ७, श्लोक १९
अर्थ : पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष ‘सर्व काही वासुदेवच आहे’, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.
४. मनुष्यजन्म आणि संत !
आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ।।
– तुकाराम गाथा, अभंग ५२०, ओवी १
अर्थ : आम्ही वैकुंठाचे निवासी आहोत; परंतु पूर्वीच्या काळी ऋषिमुनींनी जो उपदेश केलेला आहे, त्याचे प्रत्यक्ष आचरण करून दाखवण्यासाठी, तसेच भक्ती कशी करावी, हे दाखवण्यासाठी आम्ही भूतलावर आलो आहोत.
संतांनी हे रहस्य या शब्दांत सांगितले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ‘आता उरलो उपकारापुरता ।’, म्हणजे ‘आता मी केवळ दुसर्यांवर उपकार करण्यासाठीच उरलेलो आहे.’
५. गतकर्माची फळे भोगणे कुणालाही चुकत नाही !
‘प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षयः ।’, म्हणजे प्रारब्धकर्मांचे परिणाम हे भोगूनच संपवावे लागतात. ते कर्म भोगण्यानेच क्षय वा नाश होतो.
६. याच जन्मात पाप-पुण्याची फळे भोगावी लागतात का ?
६ अ. सदाचारी लोकांना यातना भोगाव्या लागणे आणि दुर्विचारी माणसे मात्र ऐश्वर्यात रहाणे, असे का ? : अलीकडे काही लोक शास्त्रांचा अभ्यास नसतांना आपल्याच तर्काने म्हणतात, ‘कुठला आला आहे पुढचा जन्म ? सगळे इथेच भोगायचे आहे !’ हा अगदी तर्कदुष्ट विचार आहे. आपण असे अनेक लोक पहातो की, जे जन्मभर परोपकार करतात, सदाचाराने वागतात, मनानेसुद्धा पाप करत नाहीत; पण तरीही नाना रोग, दुःखपूर्ण वार्धक्य, घरच्यांकडून अपमान, हेटाळणी सहन करत ते यातना भोगत असतात. याच्या उलट कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करणारे भ्रष्टाचारी, व्यसनी, लुटारू, खुनी अशी माणसेसुद्धा कायद्याच्या कचाट्यात न सापडता सुखाने जीवन जगतात, ऐश्वर्यात रहातात. त्यांना चांगल्या, प्रेमळ, सेवावृत्तीच्या बायका मिळतात. मरणही सहज लाभते. याला उत्तर काय ? ज्याने चांगले केले, त्याच्या कपाळी दुःख का ? ज्याने वाईट केले, त्याच्या भाग्यात सौख्य का ? यामुळे कार्यकारणभावाच्या सिद्धांतालाही धक्का लागतो.
लेखांक क्र. ४२ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/829422.html
– भारताचार्य आणि धर्मभूषण प्रा. सुरेश गजानन शेवडे, चेंबूर, मुंबई.
(साभार : ग्रंथ ‘भारतीय संस्कृती’)