राज्यभरात दहीहंडी उत्सवात घडलेल्या घटना !
१. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागात शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी दहीहंडीनिमित्त मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर स्वागत कमानीचा फलक लावला होता.
जोरदार वार्यामुळे कमानीचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
सौजन्य : मुंबई Update (Mumbai Update)
२. अनेक ठिकाणी मंचावर नाचण्यासाठी नृत्यांगनांना बोलावण्यात आले होते. त्यांनी लावणीसह विविध गाण्यांवर अंगविक्षेप करत त्या नाचल्या. काही तरुणांनीही अंगविक्षेप करत नाचगाणे सादर केले. (धार्मिक उत्सवांमध्ये असे प्रकार होणे हे हिंदु धर्माला लज्जास्पदच ! – संपादक)
३. ‘गोविंदा रे गोपाळा…’, ‘बोल बजरंग बली की जय’ असा जयघोष करत दहीहंडी उत्सवाचा उत्साह वाढत होता.
४. मुसळधार पाऊस आल्याने वरळीतील जांबोरी मैदानात चिखल झाला. मैदानात मॅट नसल्यामुळे गोविंदा पथकांची गैरसोय झाली. काही गोविंदा पथकांना अनेक घंटे उभे रहावे लागल्याने त्यांनी खेद व्यक्त केला. (आयोजकांना याविषयी काय म्हणायचे आहे ? – संपादक)
५. विविध पथकांतील गोविंदांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर सर्वच राजकीय पक्षांतील आजी, माजी, भावी, इच्छुक लोकप्रतिनिधींची नावे देण्यात आली होती. काही टी-शर्टवर ‘वरळीत पुन्हा आदित्यच’, ‘जनमनाचा राजा…मुख्यमंत्री माझा’ असे लिहिण्यात आलेले होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे टी-शर्ट म्हणजे लोकप्रतिनिधींनी त्यांची गरज पूर्ण केल्याची चर्चा करण्यात आली. (सण-उत्सव काळातही राजकारण घुसवणारे आजचे लोकप्रतिनिधी ! – संपादक)
६. दादरमधील आयडीयलच्या गल्लीतील दहीहंडी उत्सवात दृष्टीहीन तरुण-तरुणींचा समावेश असलेल्या ‘नयन फाऊंडेशन गोविंदा पथका’ने मानवी मनोरा रचला. नयन फाऊंडेशनच्या दृष्टीहीन तरुणांच्या गोविंदा पथकाने ४, तर तरुणींच्या गोविंदा पथकाने ३ थरांची सलामी दिली.
७. काही ठिकाणी मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले, तर काही ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
पथकांकडून ऐतिहासिक देखावे सादर करण्याचा स्तुत्य प्रयत्न !
सौजन्य : World Of Konkan
मालाड (पूर्व) येथील शिवसागर गोविंदा पथकाने वरळीतील जांबोरी मैदानातील दहीहंडी उत्सवात तीन थरांचा मानवी मनोरा रचला. चौथ्या थरावर ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा केलेला वध’ या शिवकालीन प्रसंगाचे सादरीकरण केले. देखाव्याच्या वेळी ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या मराठी चित्रपटातील पोवाडा गीतही वाजवण्यात आले. या दहीहंडी महोत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांच्यासह दहीहंडीप्रेमींनी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला.
शिवशाही गोविंद पथकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार तानाजी मालुसरे यांचा कोंढाणा गडाच्या विजयाचा देखावा साकारला. रांझ्याचे पाटील यांच्या सुनेचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच महाराष्ट्रात आज महिलांवर होणारे अत्याचार हा विषयही या देखाव्यातून सादर करण्यात आला.
संपादकीय भूमिका धार्मिक उत्सवांतील गैरप्रकार टाळण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! |