गुरुकृपेने एका छोट्याशा वस्तीमध्ये सत्संग चालू झाल्याची साधिकेला आलेली अनुभूती
१. अनोळखी महिलांनी सत्संगाची मागणी करणे
‘आमच्या गावात एके ठिकाणी संत बाळूमामा यांचा महाप्रसाद होता. मी तेथे महाप्रसाद घेण्यासाठी गेले होते. तेथे पुणदी या गावातील इंगळे वस्ती येथील काही महिला आल्या होत्या. त्या महिलांना समजले की, मी सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रवचने आणि सत्संग घेते. त्या महिला माझ्या जवळ येऊन मला म्हणाल्या, ‘‘तुम्ही सत्संग घेता’, असे आम्हाला समजले आहे, तर तुम्ही आमच्या छोट्याशा वस्तीमध्ये सत्संग घेऊ शकता का ? आम्ही तुम्हाला तुमचे मानधनसुद्धा देऊ.’’ तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘आम्ही तुमच्याकडे प्रवचन करू आणि प्रतिसाद बघून सत्संग चालू करू. सत्संगासाठी मानधन इत्यादी काही नसते. आम्ही सेवा म्हणून प्रवचन करतो.’’
२. पहिल्या प्रवचनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणे
१.१२.२०२३ या दिवशी पहिले प्रवचन झाले. त्या वेळी २५ ते ३० महिला उपस्थित होत्या. त्यानंतर मी सलग २ प्रवचने केली. नंतर तेथे सत्संग चालू करण्याचे ठरवले. तेव्हा ‘ही सेवा करण्याची संधी दिली’, याबद्दल माझ्याकडून गुरुचरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.
३. सत्संग चालू होणे आणि सत्संगाला येणार्या महिलांनी सत्संगात सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणणे
आता तेथे नियमित सत्संग चालू आहे. सत्संगाला २५ ते ३० महिला उपस्थित असतात. त्या महिलांची शिकण्याची वृत्ती चांगली आहे. त्या सर्व महिला सत्संगात सांगितलेली सूत्रे लगेच कृतीत आणतात. त्यांनी ‘सनातन पंचांग’ आणि ‘सनातन प्रभात’चे विशेषांक घेतले अन् सात्त्विक उत्पादने वापरणे चालू केले आहे. त्यांना सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भात अनुभूती येतात. त्या महिलांना ‘कधी एकदा सत्संगाचा दिवस येतो’, अशी तळमळ लागलेली असते.
सत्संग चालू झाल्यापासून मला पुष्कळ आनंद जाणवत आहे. ही सेवा गुरुदेवच माझ्याकडून करून घेत आहेत. ‘गुरुदेवांच्या संकल्पामुळे एका छोट्याशा वस्तीमध्ये सत्संग चालू झाला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. सत्यभामा प्रकाश जाधव, पलूस, जिल्हा सांगली. (३.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |