‘देवाला परत परत न सांगणे, हाच खरा विश्वास ! हीच खरी श्रद्धा !!’
सनातन संस्थेचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर आजोबा (वय ८४ वर्षे) यांची ‘अँजिओग्राफी’ (अँजिओग्राफी म्हणजे हृदयातील रक्तवाहिन्यांतील अडथळे शोधण्याची पद्धत) करण्यात आली. त्या वेळी गुरूंवरील अढळ श्रद्धेमुळे त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.
१. पू. गुरुनाथ दाभोलकर यांना दोन-तीन रात्री छातीत तीव्र वेदना झाल्यावर त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर सर्व भार सोपवणे
‘१३.६.२०२४ (गुरुवार) या दिवशी माझी कामोठे (पनवेल) येथील ‘एम्.जी.एम्.’ रुग्णालयात ‘अँजिओग्राफी’ झाली. मला आदल्या दिवसापर्यंत साधी कल्पनाही नव्हती की, माझ्यावर अशी वेळ येईल. आधीच्या २ – ३ रात्री १२ ते ३ या वेळेत माझ्या छातीत काही काळ तीव्र वेदना होत होत्या. मी देवाला (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सांगितले, ‘काय होत आहे, ते तूच बघ ! तुला काळजी, मला नाही !’; मात्र मी क्रियमाण विसरलो नाही. हृदयरोगतज्ञांची सूचना होती, ‘अशा तीव्र वेदना झाल्यास ‘सॉर्बिट्रेट’ ही गोळी जीभेखाली ठेवायची, बरे वाटेल.’ त्याप्रमाणे मी कृती केली. ‘हृदयविकाराचा झटका येणार्यांमध्ये रात्री १२ ते ३ या वेळेत झटका येण्याचे प्रमाण अधिक असते’, असे मी ऐकले होते.
२. पू. दाभोलकर आजोबा यांनी हृदयरोगतज्ञांना स्वतःच्या प्रकृतीविषयी कळवल्यावर त्यांनी ‘अँजिओग्राफी’ करावी लागेल’, असे सांगणे
मी मागील ३ रात्री घडलेला प्रकार १२.६.२०२४ (बुधवार) च्या रात्री माझ्या नेहमीच्या हृदयरोगतज्ञांना भ्रमणभाषद्वारे कळवला. त्यांना माझी सविस्तर स्थिती कळवली. त्यांनी मला उत्तर कळवले, ‘उद्या १३.६.२०२४ या दिवशी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागामध्ये ११ वाजता येऊन भेटा. कदाचित् ‘अँजिओग्राफी’ करावी लागेल.’ तेव्हा मला भीती किंवा दडपण न वाटता समाधान वाटले.
३. रुग्णालयात गेल्यावर आधुनिक वैद्यांनी तातडीने ‘अँजिओग्राफी’ची केलेली सिद्धता पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी कृतज्ञता वाटणे
दुसर्या दिवशी मी रुग्णालयात गेलो. रुग्णालयातील शिकाऊ आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी सांगितले, ‘‘तुमची आजच तातडीने ‘अँजिओग्राफी’ आहे आणि तुमच्यासाठी ‘बेड’ (खाट) आरक्षित केले आहे.’’ हे ऐकल्यावर मी सद्गदित झालो. ‘रुग्णालयात ज्या गोष्टीच्या सिद्धतेला कित्येक दिवस आधीपासून सिद्धता करावी लागते, ती माझ्या कोणत्याही हालचालीविना झाली होती’, याचे मला आश्चर्य वाटले आणि ‘गुरुमाऊली आपल्या शिष्यासाठी किती करते !’, याची मला जाणीव झाली. अशा वेळी कृतज्ञतेखेरीज आपल्या हाती दुसरे काय आहे !!
४. ‘अँजिओग्राफी’साठी गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना वंदन करून नामस्मरण करत रहाणे
ठरल्याप्रमाणे दु. ४.३० वाजता एक परिचारक मला शस्त्रकर्म विभागामध्ये घेऊन गेले. त्यानंतर १५ मिनिटांत मला ‘अँजिओग्राफी’साठी घेतले. आरंभीच मी परात्पर गुरुदेवांना वंदन करून सांगितले, ‘तुम्हाला काळजी ! सारे काही तुम्हीच करणार आहात. येथे असणारे सारे निमित्तमात्र आहेत.’ त्यानंतर जवळजवळ २५ ते ३० मिनिटांत ‘अँजिओग्राफी’ पूर्ण झाली. त्या वेळी माझे नामस्मरण चालू होते.
५. ‘अँजिओग्राफी’ करतांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होणे
चाचणीनंतर आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘गुरुनाथ, सारे काही छान झाले. उठा !’’ तेव्हा मी आश्चर्यचकित झालो. मला कळलेही नाही, कधी काय झाले ते ! ‘ते तपासणीला आरंभ करत आहेत’, हे जाणवले; पण ‘पुढची क्रिया कधी झाली ?, हे मला कळलेच नाही. मला यत्किंचितही त्रास (वेदना) जाणवला नाही.
६. ‘देवाला एकदा सांगितल्यावर तो करणारच आहे’, अशी श्रद्धा मनी असायला हवी’, असे वाटणे
त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘ऑपरेशन असो किंवा तत्सम संकट असो, विश्वास आणि श्रद्धापूर्वक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना (देवाला) एकदाच प्रार्थना करावी आणि आपला नामजप चालू ठेवावा. ‘त्यांना परत परत आळवणे, म्हणजे आपली श्रद्धा किंवा त्यांच्यावरील विश्वास अल्प आहे’, असे मला वाटते. ‘ते करणारच आहेत’, हीच श्रद्धा आणि विश्वास मनी असावा.
म्हणून म्हणतो, ‘देवाला परत परत न सांगणे, हाच खरा विश्वास ! हीच खरी श्रद्धा !!’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– (पू.) श्री. गुरुनाथ दाभोलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२४)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |