श्रीकृष्ण शोभतसे बंधू द्रौपदीस म्हणून ।
‘एका विशेष नात्याचा विशेष दिवस म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस ! या दिवशी ‘चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला ।’ हे आणि ‘द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।’ ही दोन गीते दिवसभरात कुठे न कुठे कानी पडतातच. १८.८.२०२१ या दिवशी भाववृद्धी सत्संगात हे गीत मी भावपूर्ण ऐकले आणि त्या भावजागृतीतूनच मला पुढील कविता स्फुरली.
हा श्रीकृष्ण, हा दयाघन ।
शोभतसे बंधू द्रौपदीस म्हणून ।। धृ. ।।
भळभळले रक्त त्याचे बोट कापून ।
द्रौपदी त्वरेने देई शालू फाडून ।
गहिवरला कृष्ण नेत्र आले भरून ।
शोभतसे बंधू द्रौपदीस म्हणून ।। १ ।।
प्रसंगी उभी राहिली ती त्याच्या पाठीशी ।
‘अनुभवले त्याने’, बोले मनाशी ।
भगिनी द्रौपदी, तुझे फेडू मी कसे ऋण ।
शोभतसे बंधू द्रौपदीस म्हणून ।। २ ।।
भर दरबारी ती पडली एकली ।
हाक आर्त तिची कुणी न ऐकली ।
परी आला बंधू हा त्वरेने धावून ।
शोभतसे बंधू द्रौपदीस म्हणून ।। ३ । ।
बंधु भगिनीचे पहा हे प्रेम किती ।
विश्वात याची बहु पसरे महती ।
प्रत्येक स्त्रीस हवास तू बंधू म्हणून ।
यास्तव तू असशी विश्वबंधू दयाघन ।
शोभतोस बंधू द्रौपदीस म्हणून ।। ४ ।।
– सौ. श्रावणी फाटक, सुकापूर, पनवेल
|