बाहेर फिरतीवर असणार्या व्यक्तींसाठी खाण्यापिण्याविषयीच्या उपाययोजना !
‘आमचे काम फिरतीचे असते. त्यामुळे बाहेर खाल्ल्याखेरीज पर्याय नसतो’, ही समस्या बरेच रुग्ण घेऊन येतात. कुणी ‘पायलट’ असते, स्वतःचे आस्थापन असते, ‘कन्सल्टन्सी’ (सल्लागार वा समुपदेशक) असते, व्यवसाय तसा असतो किंवा नोकरी. यामध्ये पुढील काही गोष्टी लक्षात घेऊन स्वतःच्या शरिरावर न्यूनतम परिणाम होण्यासाठी प्रयत्न करता येईल. पुढे सांगितलेले पर्याय सतत करण्यासाठी एकदम हितकर आहेत का ? तर अजिबात नाही; परंतु जेव्हा कामाचे स्वरूपच तसे असते, परिस्थितीच तशी येत रहाते, तेव्हा lesser of the two evils (दोन वाईटांपैकी कमी) कसे निवडायचे, हे सांगायचा हा प्रयत्न आहे.
१. जेव्हा फिरती नसेल, तेव्हा घरचेच आणि ताजे खाणे यांकडे कल ठेवावा. प्रतिदिन सूर्यनमस्कार आणि चालणे, हे व्यायाम आपण कुठेही असलो तरी करता येतात. हे अग्नीला चांगले ठेवायला, तसेच शरीर स्वच्छ ठेवायला साहाय्य करतात.
२. सकाळी लवकर जाऊन रात्री अचानक मेजवानी (पार्टी) ठरते, अशी कार्य संस्कृती (वर्क कल्चर) ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात बरीच दिसते. तसे वारंवार होत असेल, तर सकाळी न चुकता नेहमीच पराठे किंवा अधिकची पोळी-भाजी जवळ ठेवावी. योग्य वेळी योग्य शब्दांत काही गोष्टींना ‘नाही’ म्हणायची सवय हळूहळू स्वतःला आणि इतरांना करावी.
३. घरून डबा अजिबात शक्य नसेल, तर अशा वेळी आधीच आस्थापनाच्या उपाहारगृहामध्ये गरम आणि शिजवलेले ज्यात मैदा नसेल, असे खाऊन घ्यावे. सगळ्या गोष्टींमध्ये चीज घेणे टाळावे.
४. बाहेर सारखे हॉटेलमध्ये रहाणे होत असेल, तेव्हा चरबीवाले पदार्थ, चीज, मेयो यांसारखे पचायला जड आणि शरिरात दाह वाढवणारे पदार्थ, चायनीज किंवा सोया सॉस, अजिनोमोटो हे टाळून ‘कॉर्न स्टार्च’ न्यूनतम असलेले सूप, डोसा, गव्हाची पोळी, डाळ, डाळ खिचडी असे खाता येईल. पंजाबी भाज्यांमध्ये शीतकपाटामध्ये साठवलेले वाटण (ग्रेव्ही बेस) म्हणून असते, जे सारखे खाणे अजिबातच हितकर नाही. त्या मानाने डोसा किंवा एखादा भाताचा प्रकार बरा पर्याय आहे.
५. ‘कार्बोनेटेड’ पेयापेक्षा सोडा, ताक किंवा पाणी असे पर्याय निवडावे.
६. घरून मग परत बाहेर जातांना जेवायची वेळ येणार असल्यास खिचडी / मूग डोसा / घावन हे पदार्थ १० ते १५ मिनिटांत तयार होतात, ते पोट भरून खाऊन मग बाहेर पडावे.
आपण खाण्यापिण्याविषयी चांगली निवड करणे महत्त्वाचे !
हे उपाय ज्यांच्याशी संबंधित आहे किंवा खरच पालट करायचे आहेत, प्रामाणिक शंका आहेत त्यांच्यासाठी आहेत. यामध्ये काही लोकांचा दृष्टीकोन हाही असतो की, अमुक हा खातो की किंवा अमुक ही खाते की, त्यांना कुठे काय होते ? असेही म्हटले जाते की, ज्याला जेव्हा जे व्हायचे ते अचानक होतेच की ! तरीही आपण प्रयत्न करून चांगली निवड ठेवली आणि टाळता येण्यासारख्या गोष्टी टाळल्या, तर मोठे आजार पटकन व्हायची शक्यता अल्प रहाते.
लक्षात घ्या, आरोग्यपूर्ण रहाणार्या व्यक्तींमध्ये ते करत असलेला व्यायाम, ८० ते ९० टक्के वेळा पाळत असलेले पथ्य, वय आणि मूळ प्रकृती या गोष्टींवर बर्याच गोष्टी ठरत असतात. प्रत्येक माणसाच्या शरिराचा प्रतिक्रिया द्यायचा वेळ आणि आरंभ (थ्रेशोल्ड) वेगवेगळा असतो, तो गाठून आजार येईपर्यंत वाट पहात बसू नये इतकेच !
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (२४.८.२०२४)