Mark Zuckerberg : अमेरिकेतील बायडेन सरकारने फेसबुकवर दबाव आणला होता !

  • ‘मेटा’चे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचा खुलासा !

  • कोरोना काळातील पोस्ट, तसेच बायडेन यांच्या भ्रष्टाचारावरील लेख यांच्यावर मर्यादा आणण्याच्या होत्या सूचना !

‘मेटा’ आस्थापनाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि बायडेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – ‘मेटा’ आस्थापनाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी अमेरिकेतील बायडेन(Biden) सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राजकीय स्वार्थापोटी बायडेन-कमला हॅरिस प्रशासनाने कोरोनाशी संबंधित पोस्ट काढण्यासाठी वारंवार दबाव आणल्याचा दावा झुकेरबर्ग यांनी केला आहे. न्यायिक समितीला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, सरकारने असा दबाव आणणे चुकीचे आहे. या विषयावर मी याआधी बोलू शकलो नाही, याची मला खंत वाटते.

झुकेरबर्ग यांनी पत्रात लिहिले की,

१. वर्ष २०२१ मध्ये बायडेन प्रशासनाने त्यांच्यावर अनेक महिने दबाव आणला होता. त्यांना कोरोनाशी संबंधित ‘मीम्स’ही (एखाद्या गोष्टीवर उपरोधिकपणे टीका करणार्‍या पोस्टही) नको होते. यावर आमचे एकमत न झाल्याने त्यांनी त्यावरून अपसन्नताही व्यक्त केली होती.

२. मजकूर काढून टाकायचा कि नाही ?, हा आमचा निर्णय आहे. आम्ही आमच्या निर्णयांसाठी उत्तरदायी आहोत.

३. मला वाटते की, आपण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही सरकारच्या दबावापुढे झुकता कामा नये. आम्ही आमच्या मजकुराच्या मानकांशी तडजोड करू नये. भविष्यातही असे काही घडले, तरी आमची भूमिका आधीसारखीच असेल.

४. वर्ष २०२० मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ने बायडेन कुटुंबाच्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणावर एक अहवाल प्रकाशित केला होता. ‘एफ्.बी.आय.’ने याला ‘रशियाकडून होत असलेला अपप्रचार (प्रॉपेगंडा) आहे’, असा आरोप करत त्याची शहानिशा करण्याची सूचना केली होती.

संपादकीय भूमिका

‘सर्वांत महान लोकशाही’ म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या अमेरिकेचे सत्य स्वरूप यातून पुन्हा एकदा समोर आले आहे. विरोधकांची तोंडे बंद करण्याचा आरोप करून भारतीय लोकशाहीवर टीका करणार्‍या अमेरिकेला आता भारताने जशास तसे उत्तर दिले पाहिजे !