Online Shopping : ऑनलाईन शॉपिंगमुळे ३०० कोटी झाडांची होते कत्तल !
नवी देहली – अमेरिकेच्या काही विद्यापिठांनी ई-कॉमर्स (ऑनलाईन खरेदी) आणि पर्यावरणाची हानी यांवर अभ्यास केला आहे. या अभ्यासातून ई-कॉमर्सच्या पॅकेजिंग साहित्यासाठी तब्बल ३०० कोटी झाडांची कत्तल होत असल्याची गंभीर गोष्ट समोर आली आहे.
१. विद्यापिठांच्या अभ्यासानुसार ई-कॉमर्ससह अन्य उद्योगांसाठी पॅकेजिंग साहित्याची आवश्यकता भासते. यात कागद, पुठ्ठा, लाकूड आदीचा वापर केला जातो. साधारणपणे झाडांपासून हे साहित्य मिळते. ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढले की, कागद आणि पुठ्ठे यांची मागणी वाढते.
२. पॅकेजिंगच्या व्यतिरिक्त लाकडाचे फर्निचर, बांधकाम साहित्य, ग्राहकोपयोगी वस्तू बनवल्या जातात. त्यासाठी प्रतिवर्षी लाखो झाडे तोडली जातात. अनेकदा पॅकेजिंग सामग्रीचा केवळ एकदाच वापर होतो आणि ते फेकून दिले जाते.
३. ऑनलाईन सेवा, क्लाऊड कॉम्प्युटिंग, डेटा सेंटर आणि स्ट्रिमिंग सेवांसाठी अधिक ऊर्जा खर्ची पडते. डेटा सेंटरला अधिक ऊर्जा लागते. त्यामुळे कार्बन उत्सर्जन वाढते.
४. ऑनलाईन शॉपिंगसाठी स्मार्टफोन, लॅपटॉप अशा डिजिटल उपकरणांची आवश्यकता असते. ही उपकरणे जुनी झाल्यावर त्यांची नीट विल्हेवाट लावता येत नाही. त्यामुळे ई- कचर्याचे प्रमाण वाढते.
५. इलेक्ट्रॉनिक उपकरण बनवण्यासाठी लिथिअम, कोबाल्ट आणि अन्य खनिज मिळवण्यासाठी खाणकाम केले जाते. त्यामुळे नैसर्गिक स्रोतांची अधिक हानी होते.
ग्लोबल वार्मिंग, प्लॉस्टिक कचरा आणि कार्बन उत्सर्जन या सार्यांचा परिणाम पर्यावरणावर होतो.
संपादकीय भूमिकाआर्थिक आणि वैज्ञानिक प्रगती यांमुळे होत असलेल्या या हानीविषयी जागतिक स्तरावर चिंतन होऊन त्यावर उपाययोजना काढणे आवश्यक ! |