Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : शिल्पकार आणि संरचनात्मक सल्लागार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !
|
मालवण – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला होता; पण तो २६ ऑगस्ट या दिवशी पडला. या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि संरचनात्मक सल्लागार (स्ट्रक्चरल कन्स्लटंट) चेतन पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला. भ्रष्टाचार, फसवणूक, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आणणे आदी कलमांनुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुतळ्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असून त्याच्या संरचनेत वापरलेले नट आणि बोल्ट गंजलेले आढळले असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Chattrapati Shivaji Maharaj Statue collapses in Maharashtra : Case filed against contractor and structural consultant
Concerns raised over substandard construction quality
Nuts and bolts discovered to be rusted pic.twitter.com/iCkiFkDPev
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 27, 2024
४ डिसेंबर २०२३ या दिवशी नौसेना दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद़्घाटन करण्यात आले होते. या पुतळ्याच्या कामासह या दौर्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या अन्य काही कामांच्या दर्जाविषयी तेव्हापासून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. आता पुतळा पडल्याने या आक्षेपांना पुष्टी मिळाली आहे.
या घटनेनंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे माजी खासदार नीलेश राणे, नौदलाचे अधिकारी यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने नौदलाला पाठवले होते पत्र
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण विभागाच्या साहाय्यक अभियंत्याने २० ऑगस्ट या दिवशी नौदलाला या पुतळ्याच्या स्थितीविषयी माहिती देणारे पत्र पाठवले होते, तसेच पुतळ्यासाठी वापरलेले नट-बोल्ट खराब झाले असून ते गंजल्याचेही कळवण्यात आले होते. ‘याविषयी शिल्पकार जयदीप आपटे यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याविषयी सांगावे’, असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राची प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनाही पाठवल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते. याचा अर्थ संबंधित यंत्रणांकडून तातडीने आवश्यक ती कृती न झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
या घटनेशी संबंधित अन्य महत्त्वाच्या घडामोडी
१. हा पुतळा उभारण्यात भारतीय नौदलाने पुढाकार घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्टला नौदलाच्या अधिकार्यांनी राजकोट येथे येऊन पुतळ्याची पहाणी केली, तसेच याविषयीचा स्वतंत्र अहवाल बनवण्यात येणार असून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.
२. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी, ‘मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा या ठिकाणी पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे या वेळी सांगितले.
३. ‘राजकोट येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याची घडलेली घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र विशेष अन्वेषण पथक (एस्.आय.टी.) नेमून चौकशी समिती गठीत करावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने केली आहे’, अशी माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी दिली.
४. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी २६ ऑगस्टला मालवण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात तोडफोड केली. या प्रकरणी नाईक यांच्यासह अन्य एकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुतळा कोसळल्याच्या घटनेचा सिंधुदुर्गात विविध ठिकाणी निषेध
१. जिल्ह्यात शिवप्रेमी, तसेच राजकीय पक्ष यांच्याकडून विविध माध्यमांतून निषेध केला जात आहे. इन्सुली, खामदेव नाका (बांदा) येथे शिवप्रेमींनी हातात झेंडे घेऊन आणि सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध केला. शिवसेना ठाकरे गटाने कणकवली शहरातील शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला आणि पुष्पहार अर्पण केला. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
२. राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज उपाख्य बंटी पाटील यांनी राजकोट येथे पहाणी केली. या वेळी पाटील यांनी, ‘राजकोट किल्ला येथे शिवाजी महाराज यांचा पुतळा बनवणारे आपटे यांना नौदलापर्यंत कुणी पोचवले, याचा खुलासा होणे आवश्यक आहे. या प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्राची क्षमा मागून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी त्यागपत्र दिले पाहिजे’, असे सांगितले.
३. पुतळा पडल्याच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कारवाई होण्यासाठी शिवप्रेमींकडून २८ ऑगस्टला मालवण शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
४. सिंधुदुर्गनगरी (ओरोस फाटा) येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवप्रेमींनी पुष्पहारअर्पण केला. या वेळी राजकोट येथे पुतळा पडल्याच्या घटनेचा आणि राज्य सरकार यांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.