Dahihandi 2024 : राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्साहात ; मुंबईत १५ गोविंदा घायाळ !
(दहीहंडी फोडणार्यांना गोविंदा म्हणतात)
मुंबई – राज्यात सर्वत्र दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईतही अनेक ठिकाणी दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. तथापि दहीहंडी फोडण्यासाठी लावण्यात येणार्या व्यक्तींच्या उंच थरांवरून कोसळल्याने विविध ठिकाणचे मिळून एकूण १५ गोविंदा घायाळ झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
घायाळ झालेल्या गोविंदांवर मुंबईतील राज्य सरकारसह महानगरपालिकेची रुग्णालयेही सिद्ध ठेवण्यात आली आहेत. गेल्या २ वर्षांत घायाळ झालेल्या गोविंदांची संख्या २०० च्या वर पोचली आहे.
लाखो रुपयांची पारितोषिके !
मुंबई आणि ठाणे जवळपास १ सहस्र ३५४ ठिकाणी दहीहंडी उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. यंदाही मुंबई आणि ठाणे येथे लाखो रुपयांची पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. या वेळी ‘गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड’मधील विक्रम मोडणार्या गोविंदा पथकाला २५ लाखांचे पारितोषिक दिले जाणार आहे. ठाणे येथे टेंभी नाक्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दहीहंडीत पुरुषांसाठी १ लाख ५१ सहस्र, तर महिलांसाठी १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले आहे.
वर्धा येथे विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू !
वर्धा – येथे दहीहंडीसाठी ‘डीजे’ची (मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपकाची) पडताळणी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. सूरज चिंदूजी बावणे (वय २७ वर्षे) आणि सेजल किशोर बावणे (वय १३ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या ते करत असतांना ही दुर्घटना घडली.