खडकवासला येथे मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीला अटक
‘गुड टच, बॅड टच’ उपक्रमातून घटना पुढे आली !
पुणे – बदलापूर येथील घटनेनंतर पुणे शहरांतील पोलिसांकडून ‘गुड टच, बॅड टच’ (चांगला स्पर्श, वाईट स्पर्श) उपक्रम राबवण्यात येत आहेत. खडवासला परिसरातील एका शाळेमध्ये या उपक्रमाची माहिती देण्यात आली. उपक्रमाची माहिती देतांना १० वर्षीय मुलीने तिच्यासोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. ६८ वर्षाच्या दिलीप मते या वासनांधाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडित मुलीने सांगितले. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करून आरोपीला अटक केली आहे. (यातून समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे. प्रशासन-पोलीस ते कधी दूर करणार ? – संपादक)
पीडिता ११ वाजता शाळेत जात होती, तेव्हा आरोपी दिलीप मते तिला ‘खाऊसाठी पैसे देतो’, असे सांगत जवळच्या एका खोलीमध्ये घेऊन गेला. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने ही घटना घरी सांगितली नव्हती.