अटकेतील आरोपी संजय रॉय याची पॉलीग्राफ चाचणीत गुन्ह्याची स्वीकृती
कोलकाता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण
(‘पॉलिग्राफ’चाचणी हिलाच ‘लाय डिटेक्टर’ असेही म्हणतात. यामध्ये व्यक्ती खरे कि खोटे बोलत आहे ? ते कळू शकते.)
कोलकाता (बंगाल) – येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची २५ ऑगस्ट या दिवशी ‘पॉलीग्राफ’ चाचणी झाली. यामध्ये संजय याने या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची सीबीआयकडे स्वीकृती दिली.
संजय याने सीबीआयला पॉलीग्राफ चाचणीच्या वेळी सांगितले की, त्याने ८ ऑगस्टच्या रात्री एका मित्रासमवेत मद्यपान केले. यानंतर ते वेश्यांच्या वस्तीत गेले. वाटेत त्याने एका मुलीचा विनयभंग केला. यानंतर संजयने त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलून तिची नग्न छायाचित्रे मागितली. त्यानंतर पहाटे ४ च्या सुमारास संजय रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पोचला. तेथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर झोपली होती. तिचे तोंड आणि गळा दाबल्यावर ती बेशुद्ध झाली. यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. त्यानंतर तो मित्राच्या घरी गेला. त्याचा मित्र कोलकाता पोलिसांत अधिकारी आहे.