छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन !
अंबादास दानवेंसह पदाधिकारी कह्यात !
छत्रपती संभाजीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगाव दौर्यासाठी जात असतांना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले. त्या वेळी त्यांच्या दौर्यापूर्वीच महाविकास आघाडीने राज्यात घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ‘जवाब दो’ आंदोलन केले. या वेळी पोलिसांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना कह्यात घेतले. त्यानंतर अंबादास दानवे म्हणाले की, आमच्या अटकेसाठी एवढा पोलीस बंदोबस्त का ? आम्ही आतंकवादी आहोत का ? आम्हालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काळजी आहे.
नाशिक येथे झालेल्या अत्याचारांच्या ३ घटना, बदलापूर अत्याचाराचा निषेध, कोलकाता वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर सामूहिक अत्याचार या घटनांचे निषेध फलक हाती घेत आणि घोषणा देत आंदोलन केले. या आंदोलनात अंबादास दानवे, राजू वैद्य, माजी महापौर नंदकुमार घोडेले आदी विविध पदाधिकारी उपस्थित होते.