नवरात्र महोत्सवात पालखीवर कुंकवाऐवजी फुले उधळण्यात येणार ! – डॉ. सचिन ओंबासे, जिल्हाधिकारी, धाराशिव
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील श्री तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्रोत्सव ३ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे. मंदिरात अनुचित प्रकार घडू नयेत, भाविकांची फसवणूक होऊ नये, यासाठी आता बोगस पुजार्यांवर कारवाई करण्यात येईल. शारदीय नवरात्रोत्सवातील सीमोल्लंघनाच्या वेळी यापूर्वी पालखीवर पोत्याने कुंकू उधळण्यात येत होते; मात्र आता पालखीवर कुंकवाऐवजी फुले उधळण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सभागृहात जिल्हाधिकार्यांनी आढावा बैठक घेतली. या वेळी जिल्हाधिकार्यांनी शहरात बॅरिकेटिंग करणे, अंतर्गत रस्ते दुरुस्त करून पथदिवे लावणे यांसह अन्य सर्व विभागांना नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बोगस पुजार्यांवर कारवाई होणार !मंदिरातील व्यवस्था कायम रहावी, भाविकांची फसवूक रोखण्यासाठी बोगस पुजार्यांवर कारवाई होणार आहे. यासाठी तिन्ही पुजारी मंडळांच्या सूचींची पुनर्पडताळणी करण्यात येऊन त्यांना क्यू.आर्. कार्ड असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे. नवरात्र महोत्सव काळात भाविकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी. |