श्री रेणुका मंदिर परिसरातील (जिल्हा बेळगाव) ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू !
बेळगाव (कर्नाटक) – महाराष्ट्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका (यल्लमा) मंदिर परिसरातील ९४७ एकरमध्ये विविध विकासकामे चालू झाली आहेत. हे मंदिर धर्मादाय विभागाच्या अंतर्गत येते. शासनाने या मंदिरासाठी २ वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार मंदिरात जमा होणारी देणगी आणि विविध स्वरूपात मिळणार्या उत्पन्नाचा भाग मंदिरासाठी व्यय केला जातो. यातूनच गतवर्षी ८८ एकरांसाठी कृती आराखडा सिद्ध करण्यात आला होता. यासाठी आता नवा आराखडा आता सिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी रचनाकारांना आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या काळात मंदिर परिसरात यात्रीनिवास, मंडप, रस्ते आणि इतर विकासकामे करण्यात आली. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद-२’ योजनेच्या अंतर्गत आता पुढील विकासकामांसाठी ११ कोटी रुपयांचे अनुदान संमत करण्यात आले आहे. याच समवेत राज्य सरकारनेही मंदिर विकास प्राधिकरण संमत केले आहे. पुढील कालावधीत या डोंगरावर ‘रोप कार’ बसवण्यात येणार आहे. सौंदत्ती डोंगरासह तुमकुरमधील मधुकर किल्ला, कोडगू मल्लळ्ळी धबधबा, हुबळी नृपतुंगा हिल्स, गदग होळल्लंमा मंदिर, गदगमधील कमलेश्वर मंदिर या ठिकाणी ‘रोप कार’ चालू करण्याचा सरकारचा विचार आहे.