सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सर्वव्यापी असल्याच्या संदर्भात साधकाला आलेली प्रचीती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या २ – ३ दिवस आधी मी त्यांची मानस पंचोपचार पाद्यपूजा केली आणि नंतर गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) नैवेद्य दाखवून झाल्यावर कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. कृतज्ञता व्यक्त केल्यावर ध्यान लागणे
मी गुरुदेवांना नैवेद्य दाखवून अशी कृतज्ञता व्यक्त केली, ‘हे श्रीमन्नारायणा, श्री महाविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली, आपल्या चरणकृपेने लाभलेले हे मधुर, पवित्र अन्न आपणच आपल्या सर्वव्यापी चरणकमली अर्पण करून घेतले. आपण त्याचा स्वीकार केला. आपण आपले उच्छिष्ट, आपला चरण महाप्रसाद आम्हा पामरांसाठी उपलब्ध करून दिला. आपणच आपल्या चरण महाप्रसादाच्या माध्यमातून साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक बळ, भक्ती अन् ज्ञान देऊन आपले धर्मप्रचाराचे कार्य आम्हा पामरांकडून करून घेत आहात. आम्ही आपल्या सर्वव्यापी श्री चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’ तेव्हा गुरुदेवांच्या पादुकारूपी श्री चरणांचे दर्शन घेत असतांना मला ध्यान लागल्यासारखे जाणवले.
२. देहली सेवाकेंद्रात असलेल्या साधकाला ध्यानात दिसलेले दृश्य आणि त्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सर्वव्यापी रूपाची प्रचीती येऊन आनंद अन् परम शांती यांची आलेली अनुभूती
काही वेळाने मला ध्यानात आसंदीवर बसलेल्या गुरुदेवांच्या चरणांचे दर्शन झाले. मला दिसले, ‘गुरुदेवांनी आसंदीत बसून त्यांचा उजवा चरण वामनाप्रमाणे उचलला. त्यांचे चरण आकाशात उंच जाऊन गोवा ते देहलीच्या दिशेने आकाशमार्गाने लांब होत माझ्या दिशेने येत होते. त्यांचा उजवा चरण मी देहली येथील सेवाकेंद्रातील ध्यानमंदिरात बसलो असतांना माझ्या मस्तकापासून चार बोटांच्या अंतरावर येऊन स्थिर झाला. तेव्हा मी सर्वव्यापी गुरुदेवांच्या चरणांजवळ नमस्काराच्या मुद्रेत बसून कृतज्ञताभावाने आणि शरणागतभावाने गुरुदेवांच्या चरणांकडे पहात नमस्कार करत आहे अन् सर्वव्यापी गुरुमाऊलींनी त्यांचा उजवा चरण माझ्या मस्तकावर धरला आहे. ते सर्वव्यापी आहेत. ते रामनाथी (गोवा) येथील आश्रमात वास्तव्याला असूनही त्यांनी त्यांचा उजवा चरण देहली येथे माझ्या मस्तकावर धरून मला धन्य धन्य केले. त्या वेळी मला आनंद आणि परम शांती यांची अनुभूती आली. मला अशी स्थिती जवळजवळ ५ मिनिटे अनुभवता आली.
३. आरती करतांना गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून भावजागृती होणे
३ अ. गुरुदेवांचे पादुकांच्या रूपात अस्तित्व जाणवणे आणि ‘केवळ गुरुदेव, त्यांचे चरण आणि स्वतः एवढेच विश्व आहे’, असे जाणवणे : त्यानंतर आरती करतांना मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती होत होती. मला गुरुदेवांचे पादुकांच्या रूपात अस्तित्व जाणवत होते. माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने अश्रू वहात होते. त्यांच्या दर्शनाने माझे मन निर्विचार झाले. ‘केवळ गुरुदेव, त्यांचे चरण आणि मी एवढेच विश्व आहे’, असे मला जाणवत होते.
३ आ. ‘मी देहली येथील ध्यानमंदिरात आरती करत नसून प्रत्यक्ष भूवैकुंठातील (रामनाथी आश्रमातील) गुरुदेवांच्या खोलीत त्यांची आरती करत आहे, त्यांना ओवाळत आहे’, असे मला जाणवत होते.
४. आरतीची सेवा झाल्यावरही पुष्कळ वेळ गुरुदर्शनाचा आनंद आणि आंतरिक शांती अनुभवणे
आरतीची सेवा झाल्यावर सर्व आवरून मी ८.४५ वाजता अल्पाहार घेण्यासाठी गेलो. तेव्हाही मी गुरुदर्शनाचा आनंद आणि आंतरिक शांती अनुभवत होतो. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि साधक यांनी मला सांगितले, ‘‘तुम्ही आज पुष्कळ आनंदी दिसत आहात.’’ तेव्हा मी त्यांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मानसपूजा करतांना मला आलेल्या अनुभूती सांगितल्या.’
– श्री. अशोक भागवत, देहली सेवाकेंद्र (मे २०२३)
|