साधिकेला सहसाधकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे
‘सेवा दोषरहित, गुणांची सांगड घालून आणि भावपूर्ण केल्याने वैयक्तिक स्तरावर तर लाभ होणारच; पण समष्टीलाही त्याचा लाभ होणार असल्याचे पुढील काही साधक आणि प्रसंग यांतून मला शिकायला मिळाले.
१. सेवेप्रती भाव आणि एकरूपता असणारे श्री. दिलीप नलावडे !
एकदा मी श्री. नलावडे यांना निरोप देण्यासाठी दूरध्वनी केल्यावर त्यांनी मला स्वतःचे नाव नम्रपणे सांगितले. त्या वेळी माझी भावजागृती झाली. यावरून साधकांनी भावपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व मला शिकायला मिळाले. काकांचा ते करत असलेल्या सेवेप्रतीचा भाव आणि एकरूपता हे गुण मला शिकायला मिळाले.
२. ‘कृतीशीलता, चिकाटी आणि सातत्य’ हे गुण असणारी कु. सिद्धी गावस !
कु. सिद्धी गावस हिला तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ती करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक वाटते. ती निरंतर कृतीशील असते. ती नामजपादी उपाय, सेवा करण्याची चिकाटी आणि सातत्य कधीही सोडत नाही. ‘तिच्यातील ‘कृतीशीलता’ या गुणामुळे ती समोरच्यालासुद्धा कार्यरत होण्यासाठी उद्युक्त करते’, असे मला जाणवले.
३. सौ. वैष्णवी बधाले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांच्याकडून भावपूर्ण सेवेचे महत्त्व शिकायला मिळणे
एकदा मी हस्तप्रक्षालन पात्रात (वॉश बेसीनमध्ये) हात धुतांना मला ते नेहमीपेक्षा पुष्कळ चकचकीत दिसत होते, तसेच त्यातून चांगली स्पंदने येत होती. त्यामुळे ‘त्यात हात धुवू नये’, असे मला वाटत होते. तेव्हा माझ्या लक्षात आले की, ‘आदल्या दिवशी त्या हस्तप्रक्षालन पात्राची स्वच्छता सौ. वैष्णवी बधाले (पुर्वाश्रमीची कु. वैष्णवी वेसणेकर, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २४ वर्षे) या साधिकेने केली होती. तिने केलेली भावपूर्ण सेवा आणि तिच्यातील भावाची स्पंदने यांमुळे मला हा वेगळेपणा जाणवला.’ यातून ‘संत आपल्यावर भावपूर्ण सेवा करण्याचे महत्त्व का बिंबवतात ?’, हे मला शिकायला मिळाले.
४. सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी तत्त्वनिष्ठ राहून साधकांना साधनेत साहाय्य करणे
स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेसाठी आलेले साधक सत्संगात सौ. सुप्रिया माथूर यांना व्यष्टी साधनेचा आढावा देतात. तेव्हा साधक स्वतःच्या संदर्भात घडलेल्या प्रसंगातील स्वतःच्या मनाची प्रक्रिया सांगतात. काही वेळेला काही साधक वस्तूनिष्ठतेने आढावा देत नाहीत, तरीही सौ. सुप्रियाताई साधकांच्या मनातील अयोग्य प्रक्रिया समजून घेतात. त्या साधकांना अंतर्मुख करून चुकांच्या मुळाशी जाण्यासाठी साहाय्य करतात. ताई तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्या चुका सहजतेने आणि प्रेमाने सांगतात.
५. इतरांचा विचार प्रथम करणार्या सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के)
एकदा मला माझ्या चुकीमुळे सेवेत अडचण निर्माण झाली. त्याविषयी मी सौ. प्रियांका राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ३७ वर्षे) यांना विचारले. प्रत्यक्षात त्या सेवेत पुष्कळ व्यस्त असतात. तरीही त्यांनी माझी अडचण समजून घेऊन त्यावर योग्य उपाय सांगितला. यातून मला ‘इतरांचा विचार करणे’, हा गुण शिकायला मिळाला. ताईंच्यातील ‘समष्टी विषयीची तळमळ आणि इतरांना समजून घेणे’ या गुणांमुळे त्या प्रसंगाच्या मुळाशी जाऊन योग्य उपाययोजना सांगतात, हे माझ्या लक्षात आले.
वरील सर्व प्रसंगांमध्ये गुरूंनी मला शिकण्यासाठी जी दृष्टी दिली आणि जे शिकवले त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘ते सर्व गुण माझ्यातही येऊ देत’, अशी गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते.’
– सौ. संगीता श्रीकांत चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.५.२०२३)