राजकोट (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे नव्याने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला !
|
( हे छायाचित्र छापण्यामागे शिवप्रेमींच्या भावना दुखावणे, हा उद्देश नसून वस्तूस्थिती लक्षात यावी, यासाठी ते छापण्यात आले आहे !)
मालवण – नौसेना दिनानिमित्त शहरातील राजकोट किल्ल्यावर नौसेनेच्या वतीने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा २६ ऑगस्टला पडला. पुतळा पडल्याचे कळताच शिवप्रेमी, स्थानिक नागरिक आणि राजकीय नेते यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. ४ डिसेंबर २०२३ या दिवशी नौसेना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद़्घाटन करण्यात आले होते. केवळ ९ महिन्यांच्या कालावधीत पुतळा पडल्याने शिवप्रेमी संतापले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. किल्ल्याचे दार बंद करून नागरिकांना तेथे प्रवेश नाकारला आहे. ही घटना दुर्दैवी आल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
२६ ऑगस्टला दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पाऊस आणि वादळी वार्याचा जोर होता. त्या वेळी हा पुतळा पूर्णतः पडला. पडलेल्या पुतळ्याचे इतस्त: पडलेले भाग स्थानिक नागरिकांनी कापडाने झाकून ठेवले. नौसेना दिनानिमित्त घाईगडबडीत हा पुतळा उभारण्यात आला होता. राजकोट किल्ला आणि पुतळा उभारणीच्या कामाच्या दर्जाविषयी प्रारंभापासूनच विविध स्तरावर प्रतिक्रिया उमटत होत्या. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजची दुर्दैवी घटना घडल्याचे अनेकांनी व्यक्त केले.
निकृष्ट कामामुळे पुतळा कोसळला ! – वैभव नाईक, आमदार, शिवसेना (ठाकरे गट)
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे गटाचे) आमदार वैभव नाईक यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन पहाणी केली. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता असून त्यांचा पुतळा निकृष्ट कामामुळे कोसळल्याने अतीव दुःख होत आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. या कामाचे ‘ऑडिट’ होऊन निकृष्ट काम केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत’, अशी मागणी आमदार नाईक यांनी या वेळी केली.
मालवणचे वैभव असलेला हा पुतळा सरकार पुन्हा निश्चितपणे उभा करेल ! – प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष, भाजप
पुतळा पडल्याची घटना दुर्दैवी आहे. नैसर्गिक परिस्थिती आणि काही तांत्रिक गोष्टी यांमुळे ही घटना घडली आहे. शिवप्रेमींच्या भावनांचा आम्ही आदर करतो. या घटनेची चौकशी निश्चित होईल आणि मालवणचे वैभव असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा सरकार पुन्हा निश्चितपणे उभा करेल, अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केली.
या घटनेची सखोल चौकशी करावी ! – अतुल काळसेकर, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष
ही घटना संशयास्पद असून ती एक राजकीय कटाचा भाग असू शकते. येथील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि सॅटेलाईटद्वारे मिळणारी छायाचित्रे पडताळून या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य आणि केंद्र सरकार यांच्या गृहविभागाकडे केली आहे, असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सांगितले.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडणे ही फार दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना आहे. यातील दोषी व्यक्तींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करणार ! – मुख्यमंत्री
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याची संपूर्ण रचना नौदलाने सिद्ध केली होती. उद्या, २७ ऑगस्टला नौदलाचे अधिकारी मालवणला येणार आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पुन्हा दिमाखात उभा करण्याचे काम करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पार्श्वभूमी४ डिसेंबर २०२३ या दिवशी साजर्या झालेल्या नौदलदिनाच्या पार्श्वभूमीवर येथील भूईसपाट झालेल्या राजकोट किल्ल्याचे नुतनीकरण करण्यात आले होते, तसेच ‘भारतीय आरमाराचे जनक’ (फादर ऑफ इंडियन नेव्ही) म्हणून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता. १५ फूटांच्या पुतळ्याचा चबुतरा आणि २८ फूट उंचीचा पुतळा, अशा एकूण ४३ फूट उंचीचा हा पुतळा होता. राजकोट किल्ला सुशोभिकरण आणि पुतळा उभारणी यांसाठी ५ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. एवढा खर्च करून उभारण्यात आलेला पुतळा पडण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या ठिकाणापासून जवळच समुद्रात ३५० वर्षांपूर्वी बांधलेला अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला आहे. काही अपवाद वगळता हा किल्ला अजूनही अभेद्य आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला राजकोट येथील पुतळा कोसळल्याने या कामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे, अशी प्रतिक्रिया काही शिवप्रेमींनी व्यक्त केली. |
संपादकीय भूमिका९ महिन्यांपूर्वी बांधलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो, याचा अर्थ त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होते, असाच होतो. यास उत्तरदायी असणार्यांना शिक्षा करा ! |