नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम खात्यात लाखो रुपयांचा घोटाळा !
तत्कालीन उपविभागीय अभियंत्याविरुद्ध गुन्हा नोंद !
नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपविभागीय अभियंता आणि आरोपी तोलीराम राठोड यांनी लाखो रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी २४ ऑगस्ट या दिवशी राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी राठोड यांच्या कार्यकाळात ७ ते १२ डिसेंबर २००९ या कालावधीत शहरात हिवाळी अधिवेशन झाले होते. अधिवेशनाच्या काळात विविध विभागांकडून अनेक कामे झाली. यामध्ये रंगकाम, ‘डस्टिंग’, बांधकाम आदी कामांचा समावेश होता; परंतु त्यातील अनेक कामे त्यांच्या विभागाच्या कक्षेत येत नसूनही त्या कामांवर रक्कम व्यय झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी शासनाच्या खात्यातून विभागाच्या नावावर ३ वेळा ४२ लाख रुपये घेतले आणि लाखो रुपये विविध कामांवर व्यय केल्याचे दाखवले, तर नोंदीत कामे दाखवली.
प्रत्यक्षात कामे झालेली नाहीत. लाखो रुपयांची कामे केवळ कागदावर दाखवून या सरकारी पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे. त्याच्या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. चौकशी समिती स्थापन करण्यात आली. त्यांचे नागपूरहून स्थानांतर झाले असून सध्या ते सेवानिवृत्त आहेत. या प्रकरणाचे अन्वेषण चालूच होते. आरोपांची खातरजमा झाल्यानंतर प्रकरण पोलिसांकडे गेले. त्यामुळे राठोड यांच्यावर शासकीय निधीच्या अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घोटाळ्यात विभागातील आणि विभागाबाहेरील काही खासगी कंत्राटदारांचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. या संदर्भात या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम चालू आहे. काही लोकांची चौकशीही चालू आहे; मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.
संपादकीय भूमिका :१५ वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याची अजून चौकशी आणि पोलिसांचे अन्वेषण कसे चालू आहे ? २-३ मासांत या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषी राठोडसह इतरांवर कठोर कारवाई करायला हवी होती. या प्रकरणात अनेकांनी भ्रष्टाचार केला असल्याने त्यांच्यावरही कठोर कारवाई करायला हवी ! |