आजपासून पुन्हा उपोषण करणार ! – लक्ष्मण निगुडकर, सरपंच
निगुडे गावाच्या सीमेजवळ असणार्या दगडांच्या खाणी बंद करण्याच्या आश्वासनाला प्रशासनाकडून हरताळ !
सावंतवाडी – तालुक्यातील निगुडे गावच्या सीमेजवळ असलेल्या दगडांच्या खाणी आणि क्रशर बंद करण्याचे आश्वासन तहसीलदारांनी १५ ऑगस्टला दिले होते; मात्र अद्यापही आश्वासनाची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ २६ ऑगस्टपासून ग्रामस्थांसह पुन्हा बेमुदत आंदोलन करणार, अशी चेतावणी निगुडे गावचे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रशासनाला दिली आहे.
निगुडकर यांनी म्हटले आहे की, निगुडे गावच्या सीमेलगत असलेल्या दगडांच्या खाणीत वेळीअवेळी केल्या जाणार्या स्फोटांमुळे, तसेच क्रशरमुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन हानी झाली आहे. या दगडांची भरधाव डंपरमधून वाहतूक केली जात असल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे महसूल प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे घरांच्या झालेल्या हानीची भरपाई मिळावी, गावातून होणारी क्षमतेपेक्षा अधिक मालाची (ओव्हरलोड) वाहतूक आणि केले जाणारे स्फोट बंद करण्याच्या अनुषंगाने गावातच बैठक घ्यावी, या मागणीसाठी प्रजासत्ताकदिनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण चालू केले होते. तेव्हा तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ४ दिवसांत संबंधित विभागांच्या अधिकार्यांना गावात बोलावून प्रत्यक्ष पहाणी करून आणि ग्रामस्थांसमवेत बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले होते; मात्र अद्याप या आश्वासनाची पूर्तता करण्यात न आल्याने पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
संपादकीय भूमिकाग्रामस्थांना उपोषण करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |