श्रीरंगा, केवळ तुझीच मूर्ती असावी माझ्या अंतरंगी ।
‘२९.३.२०२४ या दिवशी मी सकाळी वैयक्तिक आवरतांना मनोमन श्रीकृष्णाशी बोलत होते. आदल्या दिवशी झालेल्या भक्तीसत्संगातील सूत्रे आठवून मी श्रीकृष्णाला माझ्या मनातील विचार सांगत होते. दुसर्या दिवशी रंगपंचमी होती. माझ्या मनात ‘मी श्रीरंगाच्या समवेत कसा रंग खेळू ? मी त्याला कसे आळवू ?’, असे विचार होते. त्या वेळी मला हे प्रार्थनामय काव्य स्फुरले. ते त्याच्याच चरणी अर्पण करते.
भावविश्वात तुझ्या रे कृष्णा ।
विस्मरण व्हावे जगाचे ।। १ ।।
केवळ तू आणि मी
एवढेच स्मरणात रहावे ।। २ ।।
भावश्रूंनी नयन भरता
अंधुक व्हावे सारे (टीप ) ।। ३ ।।
अंतःचक्षूंनी पहाता
तुझे दर्शन व्हावे ।। ४।।
पहावेस तू माझ्याकडे प्रीतीने हसून
आनंद देतोस रे कान्हा, किती भरभरून ।। ५ ।।
कृतज्ञतेची भावसुमनांजली वहावी तुझ्या चरणी ।
श्रीरंगा, केवळ तुझीच मूर्ती असावी माझ्या अंतरंगी ।। ६ ।।
(टीप : स्वभावदोष आणि अहं नष्ट व्हावेत.)
– तुझे अज्ञानी लेकरू,
सौ. प्रज्ञा पुष्कराज जोशी, देवद, पनवेल. (२.४.२०२४)
|