गणेशोत्सव मंडळांनी सांस्कृतिक कार्यक्रमासह पारंपरिक वाद्यांवर भर द्यावा ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री
बाणेरमध्ये (पुणे) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक !
पुणे – गणेशोत्सव मंडळांनी आगामी गणेशोत्सव सामाजिक भावनेतून शांततेत आणि उत्साहात साजरा करावा. मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावे, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. चतु:शृंगी पोलीस ठाणे आणि पुणे महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाणेरमधील ‘साफा बॅन्क्वेट हॉल’ येथे आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही मंडळाच्या कार्यकर्त्यांना गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, गणेशोत्सव मंडळांनीही उत्सव काळात जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, त्यासाठी आपल्या देखाव्यांमधून महिला सुरक्षा, राष्ट्रीय सुरक्षा असे विषय साकारावेत. बैठकीस पोलीस अधिकार्यांसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.