श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ‘साधकांच्या कला श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण करणे’, असा केलेला भावजागृतीचा प्रयोग आणि त्याविषयी जाणवलेली सूत्रे
‘६.९.२०२३ या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. त्याच्या आदल्या दिवसापासून मला अकस्मात् पुष्कळ आनंद जाणवत होता. मला कितीतरी दिवसांनी असा आनंद अनुभवता येत होता. तेव्हा रात्री देवाने मला विचार दिला, ‘उद्या जन्माष्टमीच्या दिवशी संगीत आणि नृत्य या कलांचा अभ्यास करणार्या सर्व साधकांना एकत्रित करून भावजागृतीचा प्रयोग करूया अन् सर्व जण श्रीकृष्णाच्या भावरंगात रंगून जाऊया.’
(भाग १)
१. जन्माष्टमीच्या दिवशी केलेला भावजागृतीचा प्रयोग
१ अ. श्रीकृष्णाचा जन्म : ‘आपण श्रीकृष्णाच्या चरणी भावपूर्ण नमस्कार करत आहोत. आपण द्वापरयुगातील गोप-गोपी आहोत. आपण श्रीकृष्ण जन्माची प्रतीक्षा करत आहोत. वातावरणात पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत आहे. श्रीकृष्णाचा जन्म झाला आहे. श्रीकृष्णाच्या जन्माचे वृत्त कळताच आपण धावत नंदाच्या घरी गेलो आहोत. सर्व जण पाळण्यातील गोजिर्या बाळकृष्णाला न्याहाळत आहेत. त्या दैवी बालकाचे रूप पाहून आपण मंत्रमुग्ध झालो आहोत.
१ आ. श्रीकृष्णाने बाललीला करणे : आता श्रीकृष्ण मोठा होत आहे. आता त्याच्या बाललीला चालू झाल्या आहेत, उदा. गवळणींची मडकी फोडून दही आणि लोणी खाणे, आईला विश्वरूप दाखवणे.
१ इ. श्रीकृष्णाच्या बासरीचा सुमधुर नाद साधकांनी ऐकणे आणि साधकांनी गायन, नृत्य आणि वादन या कला सादर करणे : आता श्रीकृष्ण आपल्याला युवा रूपात दिसत आहे. एक दिवस आपल्याला अकस्मात् बासरीचा सुमधुर नाद ऐकू येत आहे. (यानंतर १ ते १.३० मिनिटे बासरीची धून लावली होती.) आपण या दैवी नादाकडे आकृष्ट झालो आहोत. कुठून बरे हा दैवी नाद ऐकू येत आहे ? आपण या नादाचा वेध घेत एका जंगलातील एका झाडाजवळ येऊन पोचलो आहोत. पहातो, तर काय ! हे दैवी सूर श्रीकृष्णाच्या वेणूचे आहेत. त्या चैतन्यमय सुरांच्या श्रवणाने आपण मंत्रमुग्ध झालो आहोत. त्या सुरांमध्ये आपण आपले अस्तित्व विसरून श्रीकृष्णाच्या जवळ डोळे मिटून बसलो आहोत. संपूर्ण वातावरणात वेगळाच आनंद जाणवत आहे. बासरीचे सूर थांबल्यावर अकस्मात् कु. मयुरी आगावणे, सौ. भक्ती कुलकर्णी, सौ. अनघा जोशी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४३ वर्षे) आणि सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे) या साधिका गात असून त्यांच्या गायनाचे सूर श्रीकृष्णाच्या चरणांशी लीन होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. ‘साधिका गात असतांना त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रूंचा अभिषेक श्रीकृष्णाच्या चरणांवर केव्हा झाला’, हे त्यांना समजले नाही. आता वातावरणात मनोजकाका (श्री. मनोज सहस्त्रबुद्धे) वाजवत असलेल्या सतारीचे स्वर झंकारत आनंदाची उधळण करत आहेत. सतारवादन करतांना काकाही ध्यानावस्था अनुभवत आहेत. सतारीच्या आनंदी स्पंदनांमुळे कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), कु. शर्वरी कानस्कर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), सौ. सावित्री इचलकरंजीकर, कु. मृणालिनी देवघरे, कु. अंजली कानस्कर आणि कु. तीर्था देवघरे यांचे नृत्य कधी चालू झाले’, ते आपल्याला कळले नाही. ‘या नृत्यानंदामध्ये वातावरणातील आनंद द्विगुणित झाला आहे’, असे आपण अनुभवत आहोत. सौ. शुभांगी शेळके, कु. मृण्मयी केळशीकर श्रीकृष्णाच्या बाललीला नाट्याच्या माध्यमातून सादर करून आपल्याला श्रीकृष्णाच्या रंगात रंगवून टाकत आहेत. आपण श्रीकृष्णाच्या चरणी लीन झालो आहोत.
१ ई. श्रीकृष्णाने साधकांना आशीर्वाद देणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांकडून कलेच्या माध्यमातून साधना करून घेणे : श्रीकृष्णाने आपल्याला आशीर्वाद दिला, ‘जेव्हा जेव्हा मी पृथ्वीवर अवतार घेईन, त्या वेळी तुम्ही सर्व जण माझ्या समवेत असाल.’
आज कलियुगांतर्गत कलियुगात आपण जन्म घेतला आहे आणि श्रीविष्णूचे अंशावतार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या समवेत आपल्याला पुन्हा कलांच्या माध्यमातून साधना करण्यासाठी भगवान श्रीविष्णूनेच जन्माला घातले आहे.
द्वापरयुगात आपली कलेच्या माध्यमातून व्यष्टी साधना होत होती; परंतु आता कलियुगात काळानुसार केवळ व्यष्टी साधना नाही, तर त्याला समष्टी साधनेची जोड देण्याचे मार्गदर्शन सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केले आहे. त्यामुळे ‘कलेच्या माध्यमातून साधना करता येणे’, हा भाग समष्टीपर्यंत पोचवणे’, ही आपली साधनाच आहे. ‘काळानुसार आपली समष्टी साधना नीट व्हावी’, यासाठी आपल्याला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करायचे आहेत.
१ उ. प्रार्थना आणि कृतज्ञता : हे श्रीमन्नारायणा, हे सच्चिदानंद गुरुदेवा, या घोर कलियुगात आपणच आम्हाला कलेच्या माध्यमातून साधना शिकवली आणि या साधनेच्या माध्यमातून आमची प्रगतीही करून घेत आहात. आमच्यामधील स्वभावदोष आणि अहंरूपी काटे दूर होऊन एक निर्मळ पुष्प बनून हे फूल तुझ्या चरणी तूच अर्पण करून घे, भगवंता !
या मार्गाने साधना करतांना हळूहळू आपण साधनापथावरून पुढे जात आहोत. आपल्याला विविध प्रकारच्या अनुभूतीही येत आहेत. आता पुढच्या टप्प्यावर गेल्यावर आपल्याला लक्षात येते, ‘आता आपल्यातील कलेचा भागही मागे राहून आपल्याला केवळ त्या भगवंताच्या अनुसंधानाचीच ओढ निर्माण झाली आहे. आता मी आणि भगवंत यांच्यातील अंतर हळूहळू दूर होऊन त्याच्या मीलनाचा आनंदच केवळ आपल्यात भरून राहिल्याचे आपण अनुभवत आहोत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ची लीला या युगात आपण अनुभवतो आहोत. भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच आज आपण या भावजागृतीच्या प्रयोगाच्या माध्यमातून त्यांची कृपा अनुभवू शकलो. त्याबद्दल त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करूया.’
२. भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना आणि सांगून झाल्यावर आलेल्या अनुभूती
अ. हा भावजागृतीचा प्रयोग सांगण्यापूर्वी मी त्याविषयी लिहिले नव्हते किंवा बुद्धीने ठरवले नव्हते. मला सर्व शब्द आणि वाक्ये उत्स्फूर्तपणे सुचत होती. ‘ही वाक्ये कुणीतरी माझ्या माध्यमातून बोलून घेत आहे’, असे मी अनुभवत होते.
आ. मी भावजागृतीचा प्रयोग सांगत असतांना माझी भावजागृती होत होती.
इ. भावजागृतीच्या प्रयोगाचा शेवट होत असतांना माझा श्वासोच्छ्वास संथपणे होऊ लागला. मी बोलत होते; मात्र मी आतून शांती अनुभवत होते.
ई. भावजागृतीचा प्रयोग सांगून झाल्यावर मला पुष्कळ वेळ डोळे उघडता आले नाहीत. त्यानंतर ‘काही वेळ कुणाशी बोलू नये’, असे मला वाटले. मला केवळ ‘शांतीच अनुभवावी’, असे वाटत होते.
उ. आतापर्यंत मी अधून-मधून भावजागृतीचा प्रयोग सांगत होते. त्या वेळी माझी आणि इतरांचीही भावजागृती होत असे; मात्र या वेळी मी प्रथमच शांतीची स्पंदने अनुभवली. तेव्हा मला वाटले, ‘भावजागृतीच्या प्रयोगात ईश्वराशी एकरूपता अनुभवतांना मला एवढी शांती अनुभवता आली, तर भगवंताशी एकरूप झाल्यावर स्थिती अवर्णनीय असेल !’
हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळेच आम्ही असे अनुभवत आहोत. त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(क्रमशः)
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ४६ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१८.९.२०२३)
|