संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ यांची महानता
आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्या निमित्ताने कोटी कोटी प्रणाम !
१. ‘ज्ञानेश्वरी’ची महानता
‘संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी ‘ज्ञानोत्तर भक्ती’चा पुरस्कार केला. ‘योगी किंवा साधकाने ज्ञानप्राप्ती मोक्षाचे साधन म्हणून करावी आणि एकदा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर मात्र परत समाजामध्ये काम करून भक्तीमार्ग दृढ करावा’, अशी संत ज्ञानेश्वर यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी एका बाजूला ‘अमृताअनुभवा’सारखा अत्यंत तत्त्वज्ञ दृष्टीचा ग्रंथ लिहिला, ‘ज्ञानेश्वरी’सारखी गीतेवरील टीका लिहिली आणि दुसर्या बाजूला ‘हरिपाठा’सारखे लोकांना सहज समजतील आणि नित्य पाठात रहातील, असे ग्रंथही लिहिले. ‘ज्ञानेश्वरी’ ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. निवृत्तीनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर संत ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन आहे, तो एक श्रोतृसंवाद आहे. ‘ज्ञानेश्वरी’च्या १८ अध्यायांपैकी ९ अध्यायांमध्ये संत ज्ञानेश्वर यांनी श्रोत्यांशी प्रकट संवाद साधलेला आहे. तो संवाद असा आहे की, ‘ज्ञानेश्वरी’ वाचतांना संत ज्ञानेश्वर अगदी आपल्या निकट येऊन आपल्याशी बोलत आहेत’, असे आपल्याला वाटते; पण असे असूनही ‘ज्ञानेश्वरी’ कधी बहिर्मुख होत नाही, तिची अंतर्मुखता ती सोडत नाही.
गुरुदेव रामचंद्र रानडे यांच्या मते, ‘संत ज्ञानेश्वर यांनी केलेला गीतेचा तात्पर्यार्थ पूर्णपणे साक्षात्कारपर असून एका दृष्टीने शंकराचार्यांच्या वेदांतपर अर्थाच्या पलीकडचा आणि वरचा आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय.’
२. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहितांना श्रोतृसंवाद साधून त्यांना त्यात सहभागी करून घेणे
संत ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली, लोकांना सांगितली, लोकांशी वेळोवेळी संवादही साधला. त्यांच्या या श्रोतृसंवादाची काही वैशिष्ट्ये पाहिली, तर असे दिसते की, त्यांचा श्रोतृसंवाद हा खर्या अर्थाने आहे. त्या संवादाचे एक महत्त्वाचे आणि अनन्यसाधारण वैशिष्ट्य, म्हणजे ‘श्रोता हा निर्मिती प्रक्रियेत सहभागी आहे’, याची स्पष्ट जाणीव त्यांना आहे, तसेच हे संवाद सविस्तर आणि मनापासून आहेत. त्यातून त्यांचा अलौकिक, आंतरिक व्यक्तीमत्त्वाचा आविष्कार झालेला आहे. त्यामुळे ते भावकाव्याच्या पातळीवर जातात. स्वतःचे विवेचन फुलवतांना संत ज्ञानेश्वर हे श्रोत्यांच्या प्रगट आणि संभाव्य प्रतिक्रिया लक्षात घेतात. संत ज्ञानेश्वर यांच्या श्रोतृसंवादात अंतर्मुखता असल्यामुळे त्यांचा श्रोता हा ज्ञानेश्वरीच्या आशयाचाच एक भाग होतो.
३. ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी !
संत ज्ञानेश्वर यांच्यावर २ संप्रदायांचे संस्कार होते. एक म्हणजे नाथसंप्रदाय आणि दुसरा भागवतसंप्रदाय ! या २ संप्रदायांतील विचारसरणींचे ऐक्य संत ज्ञानेश्वर यांनी घडवून आणले आणि ज्ञानभक्तीचे एक नवे तत्त्वज्ञान जगाला दिले. ‘ज्ञानेश्वरी’च्या अखेरीस त्यांनी स्वतःची नाथपंथीय गुरुपरंपरा दिलेली आहे. ‘ज्ञानेश्वरी’च्या ६ व्या अध्यायात संत ज्ञानेश्वर यांनी कुंडलिनीच्या संदर्भात जे विवेचन केले आहे, ते सर्व नाथपंथातील विचारसरणीचे आहे. ९ व्या अध्यायात आलेल्या हठयोगाच्या विषयाकडे संत ज्ञानेश्वर नाथपंथियांच्या दृष्टीने पहातात. नाथपंथाच्या अशा खुणा ‘ज्ञानेश्वरी’त अनेक ठिकाणी दिसतात. भक्तीचे तत्त्व पुनःपुन्हा मांडलेले दिसते. ‘ज्ञानेश्वरीचे मुख्य अधिष्ठान भक्ती हेच आहे, असे दिसते’, असे मत डॉ. शं.गो. तुळपुळे यांनी मांडले आहे.
४. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ‘ज्ञानेश्वरी’च्या माध्यमातून मराठी भाषेचे सुंदर रूप आणि वैभव दर्शवणे !
‘ज्ञानेश्वरी’च्या भाषेचा विचार केला, तर गीतेसारख्या तात्त्विक ग्रंथावरील ही काव्यरूप मराठी टीका आहे; पण येथे काव्य आणि तत्त्वज्ञान यांचे विलक्षण ऐक्य प्रत्ययास येते. मुख्य म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी मराठीचे स्पष्ट भान ठेवले आहे. मराठी भाषेविषयीचा अभिमान ठसठशीतपणे व्यक्त केला आहे. मराठीच्या आविष्कार क्षमतेविषयी त्यांना विश्वास होता. संस्कृत भाषेतील अनेक संदर्भ ‘ज्ञानेश्वरी’त आले असले, तरी भाषेविषयीचा खणखणीत देशीपणा टिकून राहिलेला आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या काळात मराठी नुकतीच वाङ्मयत्व पावली होती. तथापि संत ज्ञानेश्वर यांच्या मराठी भाषेचे सुंदर रूप पाहिले की, भाषेचे वैभव काय असते, याचा आनंददायक प्रत्यय येतो. संत ज्ञानेश्वर यांनी अनेकदा श्रोत्यांपुढे स्वतःची नम्रता प्रकट केली आहे. तथापि त्या नम्रतेमागे त्यांच्या कवित्व शक्तीचा भक्कम अभिमानही आहे.
५. ‘पसायदान’ ही एक अत्युत्कट प्रार्थना आणि कृपाप्रसादाचे दान !
‘ज्ञानेश्वरी’तील ‘पसायदान’ ही एक अत्युत्कट प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर यांचे हे पसायदान, म्हणजे मराठी भाषा आणि संस्कृती यांचा अमूल्य ठेवा आहे. विश्वात्मक देवाला, म्हणजे विश्वेश्वरावाला संत ज्ञानेश्वर यांनी पसायदान देण्याची विनवणी केली आहे. पसायदान, म्हणजे कृपाप्रसादाचे दान ! हे दान ज्याच्याकडून अपेक्षित आहे तो विश्वात्मक देव वा श्रीविश्वेश्वराव, म्हणजे संत ज्ञानेश्वर यांचे गुरु प्रत्यक्ष निवृत्तीनाथ होत. ‘ज्ञानेश्वरी’च्या १८ व्या अध्यायाच्या अखेरीस संत ज्ञानेश्वर यांचे पसायदान, म्हणजे प्रसाददान किंवा कृपेचे दान असून ‘ज्ञानेश्वरी हा एक वाग्यज्ञ’ होता. ‘या वाग्यज्ञाने विश्वात्मकदेव संतुष्ट व्हावा आणि त्याने मला पसायदान द्यावे’, अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर यांनी केलेली आहे.
६. संत ज्ञानेश्वर माऊली आणि ‘ज्ञानेश्वरी’ आजच्या काळातही उपयुक्त !
जागतिक स्पर्धेच्या आणि पर्यावरण र्हासाच्या काळात आपण सध्या जगत आहोत. सामाजिक उन्नतीपेक्षा वैयक्तिक उन्नती पहाणार्या सुखलोलूप समाजाचे भविष्य काय ? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा आहे. या विषण्ण करणार्या परिस्थितीत संत ज्ञानेश्वर आपणास नवा विचार देतात. ७२७ वर्षांनंतरही संत ज्ञानेश्वर आजही ताजे टवटवीत वाटतात. केवळ आवश्यकता आहे ती त्यांना परत एकदा नव्याने समजून घेण्याची ! मराठी भाषा आणि तिची सांस्कृतिक वीण घट्ट बांधण्यासाठी अन् कल्पकतेचे नवे सर्जन करण्यासाठी पुढच्या पिढीने ज्ञानेश्वरी नव्याने वाचली पाहिजे. ‘संत ज्ञानदेवांचे आर्त आपल्या मनी प्रकाशले पाहिजे’, हीच प्रार्थना संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या चरणी करूया.’
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जानेवारी २०२१)