संपादकीय : भारताला श्रीकृष्णनीती हवी !
मध्यप्रदेश सरकारने शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचा आदेश देऊन तेथील जनतेला सु:खद धक्का दिला आहे. या निमित्ताने ‘मंदिरांची स्वच्छता करण्यात यावी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे’, असेही सांगितले आहे. श्रीकृष्णाने घेतलेले शिक्षण, मैत्री आणि त्याने सांगितलेले जीवनाचे तत्त्वज्ञान यांवर आधारित हे कार्यक्रम असतील. या निर्णयाद्वारे मध्यप्रदेश शासनाने अत्यंत चांगला पायंडा पाडला आहे. उज्जैन येथे भगवान श्रीकृष्णाने सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेतले. त्यामुळे मध्यप्रदेश आणि त्यातही उज्जैनला महत्त्व आहे. हा महत्त्वाचा इतिहास लक्षात घेऊन सुंदर योग साधत मध्यप्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक व्हायला हवे. यामुळे शिक्षणाविषयी एक चांगला संदेश शाळा आणि महाविद्यालये यांतील विद्यार्थ्यांमध्ये जाईल. अवताराने गुरुकुलात राहून शिक्षण घेतलेल्या या भूमीत खरेतर पुष्कळ पूर्वीच हा निर्णय घेतला पाहिजे होता. असो, मात्र विलंबाने का असेना, सरकारने त्यांची चूक सुधारली आहे.
भारतात राम-कृष्णादी अनेक अवतार झाले आहेत. हिंदु धर्माचे मूळ ही भारतभूमीच आहे. गुरुकुलासारखी विद्यार्थ्यांचा परिपूर्ण आणि आध्यात्मिक अन् सर्वंकष अभ्युदय साध्य करून देणारी व्यवस्था या भारतभूमीत शतकानुशतके होती. आचार-विचार यांनी संपन्न असलेली ही भूमी आहे. अगदी अत्याचारी मोगलांच्या काळात येथील हिंदु जनतेने अनंत अत्याचार सहन करत धर्माचरणाद्वारे धर्म टिकवून, वैभवशाली राष्ट्र टिकवून ठेवले आहे. अवतार, संत आणि ऋषी यांनी त्यांच्या आचरणातून आदर्श कसे वागावे ? विचारसरणी कशी असावी ? संस्कार कसे करावेत ? ज्ञानार्जन कसे करावे ? स्वत:ची कर्तव्ये काय ? दायित्व काय ? त्याग, क्षमा आणि सहिष्णुता यांचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले आहे. त्यामुळे आदर्श घ्यायचा झाल्यास त्यांचाच आदर्श घेतला पाहिजे. थोडक्यात काय, तर बालपणापासून विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांचे महत्त्व विविध माध्यमांतून बिंबवले पाहिजे. जेणेकरून विद्यार्थी त्यानुसार कृती म्हणजेच आचरण करून स्वत:चे जीवन उन्नत करू शकतील. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांमध्ये त्यांच्याविषयी कार्यक्रम ज्यामध्ये त्यांच्यावरील व्याख्यान, चर्चासत्रे, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्र काढण्याची स्पर्धा, भगवद्गीतेच्या श्लोकांचे अर्थासहित पाठांतर, कथाकथन असे विविध उपक्रम राबवल्याविना आणि ते सर्व वयोगटांसाठी बंधनकारक केल्याविना विद्यार्थ्यांना आत्मसात करणे कठीण आहे.
साम्यवादी धोरणांचा प्रभाव !
आपल्याकडे साम्यवादी विचारवंतांनी शिक्षणक्षेत्रात प्रवेश केल्यामुळे पुस्तके, अभ्यासक्रम, शाळेतील उपक्रम, शाळेतील शिक्षकांची विचारसरणी हे सर्व भारतीय संस्कृती, सभ्यता, परंपरा यांना प्रतिकूल असतात. पुढच्या पुढच्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी हिंदु धर्माविषयी आत्मीयता, आस्था बाळगणे तर दूरच उलट धर्मविरोधी बनण्याकडे त्यांचा प्रवास चालू होतो आणि शेवटी अतिशय उच्चविद्याविभूषित झालेला तरुण पक्का बुद्धीप्रामाण्यवादी, हिंदुविरोधी, साम्यवादी किंवा समाजवादी होतो. तो देव-धर्म यांना विरोध करतो, स्वत: हिंदु असल्याचे चारचौघांमध्ये सांगण्यासही त्याचे धाडस होत नाही. उलट हिंदु धर्मातील श्रद्धास्थानांवर टीका-टिप्पणी करून, विनोद करून स्वत: किती पुढारलेला आहे, हे तो दाखवून देतो.
भारतीय संस्कृतीशी विद्यार्थीदशेपासून तुटणारी नाळ यापुढे तुटू न देणे, हे शाळा-महाविद्यालयांपेक्षा शासनकर्ते आणि प्रशासन यांचे उत्तरदायित्व आहे. राजाचा धर्म तोच प्रजेचा धर्म बनत असल्याने शासनकर्त्यांनी पूर्ण आत्मविश्वासाने आणि कुणाचीही भीडभाड न राखता धर्माचरणाला प्रोत्साहन देणारे निर्णय घेतले पाहिजेत. शासन-प्रशासन यांनी धर्माचरणाला प्रोत्साहन देणारा एखादा निर्णय घोषित केल्यावर निधर्मीपणाचे खूळ डोक्यात शिरलेले येथील विचारवंत, मुसलमानांचा अनुनय करणारी काँग्रेस, लोकांची दिशाभूल करणारे साम्यवादी, हिंदु धर्माविषयी घृणा असणारे जिहादी धर्मांध, धूर्त ख्रिस्ती धर्माेपर्देशक एक होऊन विरोध करतात. परिणामी सरकारला निर्णय मागे घ्यावा लागतो. महाराष्ट्रात एका विद्यापिठाने गणेश अथर्वशीर्षाविषयी एक प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्याची घोषणा केल्यावरच निधर्मीवाद्यांचा एवढा विरोध झाला, शेवटी विद्यापिठाला निर्णय मागे घ्यावा लागला. शासनाने शाळेत गीता शिकवण्याचा निर्णय घेतला, तर त्याला कडाडून विरोध झाल्यामुळे तो निर्णय मागे घेतला.
मागेत शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी, रामनवमी, हनुमान जयंती, दत्तजयंती इत्यादी देवतांशी संबंधित कार्यक्रम, उत्सव साजरे करण्याचा निर्णय देऊन कोणताही गुन्हा करत नसून उलट विद्यार्थ्यांना आदर्शांशी जोडण्याचा सुंदर प्रयत्न करत आहोत, हेच सूत्र शासनकर्त्यांनी लक्षात घ्यावे. आपण प्रत्येक देवतेचा उत्सव किंवा जयंती साजरे करतो, म्हणजेच त्या देवतेच्या दैवी गुणांचे स्मरण अन् तिच्या शक्तीचे स्मरण करत असतो. देवता आणि अवतार यांनी अत्याचारांचे दमन आणि भक्त, भाविक यांना साहाय्य केले असल्यामुळे तो संस्कार आपोआपच विद्यार्थ्यांवर होणार आहे. परिणामी जी काही गुन्हेगारी प्रवृत्ती, अपराध करण्याची प्रवृत्ती असेल, तिचे अनायासे दमन होणार आहे. विद्यार्थ्यांकडून त्या दिवशी नामजप, स्मरण करवून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांची सात्त्विकता वाढून त्याचा लाभ त्यांना अभ्यास, खेळ, स्पर्धा-परीक्षा यांसाठी होऊ शकेल. म्हणजे एरव्ही कितीही व्यक्तीमत्त्व विकास, तणावमुक्ती यांचे वर्ग घेतले, समुपदेशनाचे वर्ग घेतले, त्यातूनही जे साध्य होऊ शकणार नाही, ते अशा धार्मिक उपक्रमांमधून साध्य होऊ शकेल. या निर्णयाला विरोध होणार, त्यामध्ये मुख्यत्वे देशावर निधर्मी आणि धर्मनिरपेक्षता लादणारी काँग्रेसच विरोध करणार, यात शंका नाही. धर्माभिमानी आणि श्रद्धाळू हिंदूंकडून मात्र निर्णयाचे स्वागत झालेले आहे आणि पुढेही होत राहील, हे निश्चित !
भारतात शेकडो वर्षांची प्रतीक्षा असलेल्या आदर्श राममंदिराची स्थापना झाली आहे. देशाचा प्रवास ‘राममंदिराकडून रामराज्याकडे’ होण्याकडे त्यामुळे प्रारंभ झाला आहे. देशात सध्या युवा शक्ती म्हणजेच तरुण वर्ग अधिक संख्येत आहे. ही शक्ती मात्र काही प्रमाणात दिशाहीन आहे किंवा काही प्रमाणात निधर्मीही आहे. मध्यप्रदेश सरकारच्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांकडूनही विरोध होऊ शकतो. रामराज्याचा प्रारंभ रामराज्यातील प्रजा सात्त्विक बनण्यापासून होणार आहे. सध्याच्या निधर्मी, जातीयवादी पगडा असलेल्या, जिहाद्यांची भीती असलेल्या वातावरणात असे काही उपक्रम राबवण्यासाठी म्हणजेच रामराज्याच्या वाटचालीच्या प्रवासात श्रीकृष्णनीतीचा उपयोग करावा लागणार आहे. भगवान श्रीकृष्णाने त्याच्या अवतारकाळात अतिशय कठीण म्हणून वाटलेल्या अनेक प्रसंगांमध्ये शक्तीसह बुद्धीचातुर्याने, सुष्टाशी सुष्टपणे, दुष्टाशी दुष्टपणे, प्रसंगी माघार घेऊन पुन्हा मोठी चढाई करून मात केली आहे आणि धर्मसंस्थापना केली आहे. मध्यप्रदेश सरकारने उचललेल्या चांगल्या पावलाचे अनुकरण अन्य राज्यांनीही केले पाहिजे. त्याचप्रमाणे केंद्रशासनाने ते करून केंद्रीय स्तरावरच याविषयी धोरण ठरवल्यास ते करणे राज्यांना बंधनकारक राहील. सरकार हे करील, अशी अपेक्षा बाळगूया !
मध्यप्रदेश शासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच राज्यांनी अनुकरण करावे ! |