संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली । भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली ।।
आज २६ ऑगस्ट २०२४ या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त…
‘श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या पावन चरणी ही काव्यसुमनांजली भावपूर्णरित्या समर्पित करत आहे.
गुर्वाज्ञेने विठ्ठलपंत काशीहून परतले ।
संन्यास त्यजूनी गृहस्थाश्रमी झाले ।
धर्मपत्नीसह विठ्ठलपंत आळंदीला आले ।
त्यांच्या दांपत्यजीवनाला संसारसुख लाभले ।। १ ।।
दिव्यात्मे जन्म घेती पुण्यशिलांच्या (धर्मनिष्ठांच्या) पोटी ।
पतिव्रतेलाही लाभली चार संतरत्ने गोमटी ।
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान अन् मुक्ताई छोटी ।
दिव्यतेजाने उजळली विठ्ठलपंतांची कुटी ।। २ ।।
संन्यासी विठ्ठलपंत गृहस्थ झाले ।
त्यांनी धर्मशास्त्राविरुद्ध आचरण केले ।
असे त्यांच्यावर असंख्य आरोप झाले ।
अन् त्यांना बहिष्कृत करूनी वाळीत टाकले ।। ३ ।।
पंत पापक्षालन करण्यास ब्रह्मगिरी गेले ।
त्यांनी त्र्यंबकेश्वरास मनोभावे आळविले ।
तेथे निवृत्तीनाथांना गुरु गहिनीनाथ भेटले ।
शिष्याचे जीवन श्री गुरूंनी सावरले ।। ४ ।।
शुद्धीकरणाने धर्मात प्रवेश मिळावा ।
पुत्रांचा उपनयन संस्कार व्हावा ।
यासाठी विठ्ठलपंतांनी धर्ममार्तंडांना विनवले ।
त्यांना पोटतिडकीने कळवळून सांगितले ।। ५ ।।
विठ्ठलपंताने धर्म भ्रष्ट केला ।
धर्म बुडवूनी पतित झाला ।
धर्माविन जगण्यास अर्थ न उरला ।
धर्माविन देह निष्प्राण झाला ।। ६ ।।
धर्ममार्तंडांनी पंतांवर वज्रप्रहार केला ।
विठ्ठलपंतांना प्राणदंड सुनावला ।
दया आणि क्षमा धर्मग्रंथातच राहिले ।
पंडितांचे धर्मज्ञान हवेत विरले ।। ७ ।।
निष्पाप बालकांना पाहून गहिवरूनी आले ।
विठ्ठलपंतांनी सपत्नीक प्राण त्यजले ।
दोघांनीही देहांत प्रायश्चित्त घेतले ।
अनाथ बालकांवर दु:ख कोसळले ।। ८ ।।
चारही बालके अनाथ झाली ।
सैरावैरा धावू लागली ।
गावकरी पाषाणहृदयी झाले ।
माणुसकीशून्य वागू लागले ।। ९ ।।
ममता सारी आटून गेली ।
माणुसकीही संपून गेली ।
संतरत्नांचे पाय उन्हाने पोळले ।
परंतु समाजमन जराही न कळवळले ।। १० ।।
‘संन्याशाची पोरटी’ म्हणूनी त्यांना हिणवले ।
संपूर्ण समाजाने त्यांना पुष्कळ छळले ।
चिमुकल्यांनी पुष्कळ त्रास सोसले ।
परंतु ते विठ्ठलभक्तीत तल्लीन झाले ।। ११ ।।
ज्ञानाचे तेज पैठणच्या धर्मसभेत प्रगटले ।
त्याने रेड्याच्या मुखातून वेद वदवले ।
मग पाठीवर मांडे भाजून दाखवले ।
विसोबा खेचरही त्यांना शरण आले ।। १२ ।।
योगी चांगदेवाने कोरे पत्र पाठवले ।
संतरत्नांनी भिंत चालवून सामर्थ्य दाखवले ।
मुक्ताबाईने योगी चांगदेवांचे गर्वहरण केले ।
त्यांच्या कोर्या मनावर ब्रह्मज्ञान कोरले ।। १३ ।।
संत निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना शिष्यत्व प्रदान केले ।
त्यांच्यातील सुप्त आत्मज्ञान प्रगट केले ।
त्यांच्या कृपेने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ।
संस्कृत भाषेतील भगवद्गीता मराठीत आणली ।। १४ ।।
‘ज्ञानेश्वरी’ अत्यंत लोकप्रिय झाली ।
भागवत धर्माची पताका सर्वत्र फडकली ।
त्यामुळे समाजाला नवी दिशा मिळाली ।
अन् वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली ।। १५ ।।
समाजमनामध्ये भक्तीची फुले उमलली ।
विठ्ठलभक्त संतांची फळी निर्माण झाली ।
पुढील संतांनी भक्तीची परंपरा चालू ठेवली ।
थोर ज्ञानेश्वरांच्या चरणी काव्यसुमनांजली अर्पियली ।। १६ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.८.२०२४)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |