फोंडा, गोवा येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे आधुनिक पशूवैद्य अजय जोशी (वय ६८ वर्षे) यांना श्रीकृष्णाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. साधकाला मधुराभक्तीची अनुभूती येणे

१ अ. श्रीकृष्णाच्या चित्राला उदबत्ती ओवाळतांना साधकाचे भान हरपणे : ‘२१.८.२०२३ या दिवशी मी घरातील बैठकीच्या खोलीतील श्रीकृष्णाच्या चित्राला उदबत्ती ओवाळत होतो. मी श्रीकृष्णाला उदबत्ती ओवाळत असतांनाच माझे भान हरपले आणि मी श्रीकृष्णाकडे एकटक पहात राहिलो. त्या वेळी श्रीकृष्णाच्या डोळ्यांत मला वेगळाच भाव जाणवत होता. ‘श्रीकृष्णाचे अलंकार नेहमीपेक्षा अधिक चमकत आहेत’, असे मला दिसले.

आधुनिक पशूवैद्य अजय जोशी

१ आ. साधकाला श्रीकृष्णाप्रती आगळेवेगळे आकर्षण वाटणे आणि श्रीकृष्ण ‘तू माझी पत्नी आहेस’, असे म्हणत आहे’, असे त्याला जाणवणे अन् ‘स्त्रीचे जीवन कठीण असल्याने ते मला देऊ नको’, असे त्याने श्रीकृष्णाला सांगणे : मला श्रीकृष्णाप्रती आगळेवेगळे आकर्षण वाटू लागले. त्याच वेळी ‘श्रीकृष्ण मला ‘तू माझी पत्नी आहेस’, असे सांगत आहे’, असे जाणवले. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘मी स्त्री रूपात असेन.’ मी घाबरलो आणि श्रीकृष्णाला म्हणालो, ‘मला स्त्री रूपात जन्म घ्यावा लागेल. स्त्रीचे जीवन कठीण असते. ते मला देऊ नको.’

१ इ. मला ही अनुभूती आली; मात्र दुसर्‍या क्षणी मला वाटले, ‘मी अनुत्तीर्ण झालो; कारण श्रीकृष्ण म्हणाला, ते मी स्वीकारले नाही. ही माझी चूक आहे.’

१ ई. द्वापरयुगातील गोपींप्रमाणे साधकाला अनुभूती येणे : मी सौ. अंजलीला (पत्नीला) याविषयी सांगितले. तेव्हा तिने मला सांगितले, ‘‘हा मधुराभक्तीचा प्रकार आहे.’’ द्वापरयुगात वृंदावनातील गोपींनी अशी भक्ती केली होती. गोपी स्वतःचे अस्तित्व विसरून श्रीकृष्णाला समर्पित झाल्या होत्या. खरेतर मला ही जी अनुभूती आली, त्यात माझे असे काहीच नाही. मी वेळ मिळाल्यावर प.पू. डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णाचा नामजप करतो. तेच माझ्याकडून नामजप करून घेतात. मी परम पूज्यांमध्ये श्रीकृष्ण बघतो.

२. श्रीकृष्णाचे मानस औक्षण केल्यावर आलेली अनुभूती

२ अ. साधकाने श्रीकृष्णाचे मानस औक्षण केल्यानंतर त्याला ‘पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत आहे’, असे जाणवणे : १.१०.२०२३ या दिवशी सकाळी ६.४२ वाजता मला वाटले, ‘श्रीकृष्णाच्या पत्नीच्या रूपात श्रीकृष्णाचे औक्षण करावे.’ मी त्या श्रीकृष्णाच्या चित्राच्या समोर उभा राहून श्रीकृष्णाचे मानस औक्षण केले. नंतर मी काही क्षण श्रीकृष्णाचे ध्यान केल्यावर मला वेगळेपण जाणवले. त्या वेळी माझ्याकडून ‘राधे राधे श्रीकृष्ण, श्रीकृष्ण राधे राधे’, असे म्हणणे झाले. तेव्हा त्यातून मला वेगळा आनंद जाणवला. त्या वेळी ‘पुष्कळ आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होत आहे’, असे मला जाणवले. राधा आणि गोपी यांचे माहात्म्य आठवून मी आनंदलो. मला वाटले, ‘श्रीकृष्णाच्या पत्नीच्या रूपात श्रीकृष्णाचे औक्षण करावे’, असा निर्धार त्याच वेळी गुरूंनी माझ्याकडून करून घेतला.’

२ आ. साधकाच्या भ्रमणभाषवर आलेल्या संदेशात गोपींविषयी निरूपण असणे आणि त्याची ईश्वराप्रती श्रद्धा वृद्धींगत होणे : नंतर मी भ्रमणभाषवर आलेला एक लघुसंदेश वाचला. त्या संदेशात गोपींविषयी निरूपण होते. मला आश्चर्याचा धक्का बसला. ‘पतिव्रता आणि तिची निस्सीम भक्ती अन् श्रीकृष्ण’ या केंद्रबिंदूवर ते निरूपण आधारित होते. हे निरूपण वाचून माझी ईश्वराप्रती श्रद्धा वृद्धींगत झाली. एकदा आपण श्रीकृष्णापुढे शरणागती पत्करली की, आपण ईश्वराचे होतो. त्याची कृपा शब्दातीत आहे.

‘गुरु आणि परमेश्वर (श्रीकृष्ण) आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान देतात. तेच आपला उत्कर्ष करतात’, याची जाणीव आपल्याला नसते. गुरु महान असतील, तर ते आपली प्रगती करण्यासाठी कारणीभूत होतात. हे येथे लक्षात येते. याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– आधुनिक पशूवैद्य अजय गणपतराव जोशी (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ६८ वर्षे), फोंडा, गोवा. (२.१०.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक