२ वेगळ्या घटना असूनही पोलिसांनी एकच एफ्.आय.आर्. केल्याचे उघड !
बदलापूर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण !
बदलापूर (जिल्हा ठाणे) – येथील २ अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी एकच एफ्.आय.आर्. (प्रथमदर्शनी अहवाल) नोंदवल्याचे पुढे आले आहे. पोलिसांनी त्यांच्या सोयीनुसार हा अहवाल सिद्ध केला. ही गोष्ट लक्षात आल्यावर २ स्वतंत्र एफ्.आय.आर्. करण्यात आले. (एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी हा हलगर्जीपणा कामचुकारपणा म्हणून केला कि त्यांच्यावर दबाव होता ? – संपादक)
एका मुलीसमवेत झालेल्या अत्याचाराविषयी पालकांनी दुसर्या चिमुकलीच्या आजोबांना त्याची कल्पना दिली होती. त्यामुळे तिच्या आजोबांनी त्यांच्या नातीची वैद्यकीय तपासणी खासगी रुग्णालयात करून घेतली होती. या खासगी रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालात लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. हा अहवाल शाळेच्या मुख्याध्यापिकांना दाखवल्यावर त्यांनी ‘हा वैद्यकीय अहवाल कसा खोटा ठरवता येईल’, या अनुषंगाने प्रयत्न केले.