राज्यात ठिकठिकाणी मविआच्या नेत्यांची आंदोलने !
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारला घेरण्याचा उद्देश !
मुंबई, ठाणे, पुणे, संगमनेर, संभाजीनगर, कोल्हापूर आणि अन्य काही शहरांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ ठिकठिकाणी भर पावसात आंदोलने केली. मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंदला अनुमती नाकारल्यानंतर राज्य सरकारला घेरण्यासाठी राज्यभर मूक आंदोलन करण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी स्पष्ट केला.
- ठाणे येथील गांधी चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित आंदोलन केले.
- अहिल्यानगरमधील संगमनेर येथे काँग्रेसने आंदोलन केले.
- नागपूर येथे काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी वडेट्टीवार यांनी ‘जानेवारी २०२४ पासून राज्यात २ सहस्र १४१ महिला आणि युवती यांच्यावर अत्याचार झाले आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही’, अशी सरकारवर टीका केली.
- पुणे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. या वेळी शरद पवार यांनी उपस्थितांना महिलांचे रक्षण करण्यासाठी शपथ दिली.
‘बहीण सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या ! – उद्धव ठाकरेमुंबई – मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यास पुरेसा वेळ नसल्यानेच बंद मागे घेतला. हा बंद राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. न्यायालयाने बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला. न्यायालयाने बंद मागे घेण्याच्या आदेशात दाखवलेली तत्परता बदलापूरमधील नराधमाला शिक्षा देण्यात दाखवावी. ‘बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित’ अशी स्वाक्षरी मोहीम घ्या. घराघरातील महिला माझ्या सुरक्षेच्या आड का येत आहात ?, असा जाब विचारत आहेत, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेना भवनासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आले. |