संपादकीय : बलात्काराचे पोशिंदे !
कोलकाता येथील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची करण्यात आलेली निर्घृण हत्या, बदलापूर येथील २ अल्पवयीन विद्यार्थिनींवर करण्यात आलेले लैंगिक अत्याचार आणि महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने गायब झालेल्या महिला अन् युवती, हे सर्व विषय विविध माध्यमांद्वारे ऐरणीवर असतांना मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेते महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ‘शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सिद्ध असलेल्या तरुणींनाच केरळमधील मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची संधी देण्यात येते’, असा हा अश्लाघ्य प्रकार न्यायाधीश हेमा यांच्या समितीने सरकारला सादर केलेल्या अहवालातून उघड झाला. या चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक, निर्माते आणि प्रमुख अभिनेते यांची एक टोळीच यासाठी कार्यरत आहे. हा अभद्र प्रकार केवळ मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीपुरता मर्यादित नाही. प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीसह तेलुगु, तमिळ, कन्नड, बंगाली, पंजाबी, भोजपुरी एवढेच नव्हे, तर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये महिलांचे शोषण होत असल्याविषयी अनेक महिला कलाकारांनी अनेकदा वाच्यता केली आहे. स्वत:चा गल्ला भरण्यासाठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक चित्रपटांतून ही वासनांधता समाजात विकत आहेत अन् यातून ही विकृती समाजात वेगाने पसरत आहे. समाजात वाढत असलेल्या महिलांवरील अत्याचाराला चित्रपटसृष्टीच मोठ्या प्रमाणात खतपाणी घालत आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. याला वेळीच आळा घातला नाही, तर भविष्यात महिलांवरील अत्याचार करणारे नराधम आणखी बळावतील.
भारतात देहलीपासून गल्लीपर्यंत बालिका, युवती, महिलांपासून ते वृद्ध स्त्रियाही बलात्काराच्या शिकार होत आहेत. वासनांधांना पोलिसांचा धाक नाही. राजकारणी बलात्काराच्या घटनांचेही राजकारण करण्यापर्यंत हीन झाले आहेत आणि न्यायालयात वर्षानुवर्षे खटला चालूनही गुन्हेगारांना शिक्षा होत नाही. त्यामुळे बलात्कार करून वासनांध पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय यांना मरणप्राय यातना देतात, तर दुसर्या बाजूला गुन्हेगारांना भय निर्माण करण्यास लोकशाहीतील यंत्रणा अपयशी ठरतात. अपयशी ठरतात म्हणजे तरी काय ? तर पुढच्या बलात्कारालाच प्रोत्साहन देतात. मग बलात्काराचा दोष केवळ बलात्कार्यालाच लागत नाही, तर बलात्कारावर जरब बसवण्यास अपयशी ठरणार्या लोकशाहीतील यंत्रणाही तितक्याच दोषी आहेत.
आतातरी ठोस कारवाई करा !
काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘गांधी’ या चित्रपटानंतर मोहनदास गांधी यांची खर्या अर्थाने जगभरात ओळख झाली’, अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. यामध्ये त्यांनी केलेल्या काँग्रेसवरील टीकेच्या दृष्टीने न पहाता एका चित्रपटाचा प्रभाव किती पडतो, याचे महत्त्व नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यातून अधोरेखित होते. मागील अनेक वर्षे चित्रपट आणि वेब सिरीज यांच्या माध्यमातून समाजावर अनैतिकता, व्यभिचार, बलात्कार, गुन्हेगारी, भ्रष्टाचार यांच्या उदात्तीकरणाचा मारा चालू आहे. समाजातील वाढत्या बलात्काराच्या घटना या त्याचाच परिणाम आहे. जून २०२० मध्ये अभिनेते सुशांत राजपूत यांच्या मृत्यूनंतर झालेल्या चौकशीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे बाहेर आले होते. अमली पदार्थांचे सेवन करणार्या चित्रपटसृष्टीतील अनेक तारकांची नावे यातून बाहेर आली. या वेळी काही अमली पदार्थांच्या तस्करांना अटकही करण्यात आली; मात्र यानंतर त्यावर अद्यापपर्यंत ठोस कारवाई झालेली नाही. मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीतील महिलांच्या लैंगिक शोषणातून उघड झालेल्या अपप्रकाराविषयी सरकारने देशभरातील विविध चित्रपटसृष्टीत चाललेले अनैतिक धंदे रोखण्यासाठी वेळीच कार्यवाही करायला हवी.
चित्रपटसृष्टी नव्हे, गुन्हेगारीचा अड्डा !
वर्ष १९१३ मध्ये जेव्हा भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी चित्रपटाची निर्मिती केली, त्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीवर भारतात विविध भाषांमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आदी विविधांगी चित्रपटांची निर्मिती झाली. सद्यःस्थितीत चित्रपटसृष्टी ही केवळ मनोरंजन आणि कलेचे क्षेत्र राहिलेले नाही, तर गुन्हेगारी क्षेत्रातील काळा पैसा पांढरा करण्याचे चित्रपट हे मोठे माध्यम म्हणून उदयाला आले आहे. एखादा नवीन चित्रपट आल्यावर त्या चित्रपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याची वृत्ते माध्यमांवरून प्रसारित होतात. अनेक वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे यांतून याविषयीची वृत्ते प्रसिद्ध होतात. प्रत्यक्षात मात्र चित्रपटगृहे रिकामी असतात. अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक चित्रपटांमध्ये गुंतवणूक करतात आणि चित्रपटांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केल्याचे दाखवून हा पैसा वैध करून घेतात. मधल्या काळात अनेक मुसलमान अभिनेत्यांना चित्रपटसृष्टीत जाणीवपूर्वक स्थापित करण्यात आले. हिंदु अभिनेत्री आणि मुसलमान अभिनेता अशा जोड्या दाखवून हिंदु युवतींच्या मनात मुसलमान युवकांविषयी आकर्षण निर्माण करण्यात आले. चित्रपटसृष्टीतील अनिल कपूर, ऋषि कपूर, संजय दत्त आदी अनेक आघाडीच्या अभिनेत्यांची नावे दाऊदसमवेत जोडली गेली. मोनिका बेदी हिचे आतंकवादी अबू सालेम याच्याशी असलेले संबंध; अभिनेत्री मंदाकिनी, उर्मिला मातोंडकर यांचे कुख्यात दाऊदशी असलेले संबंध हे चित्रपटसृष्टीतील गुन्हेगारीकरणाची मोठी उदाहरणे आहेत. दाऊद याच्याकडून हिंदी चित्रपटसृष्टीला होत असलेल्या अर्थपुरवठ्याविना हे शक्य नाही.
मागील काही दशकांमध्ये भारताची हिंदु संस्कृती, सभ्यता नष्ट करण्यात आणि अनैतिकता वाढवण्यात चित्रपटसृष्टीच सर्वाधिक कारणीभूत ठरलेली आहे. लव्ह जिहादला प्रोत्साहन, ‘सेक्स स्कँडल’ चालवणे, अमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी आणि व्यभिचार यांना प्रोत्साहन अशा अनेक अनैतिक गोष्टींचा चित्रपटसृष्टी हा अड्डा झाला आहे. मल्ल्याळम् चित्रपटसृष्टीतून हे प्रकार पुन्हा पुढे आले आहेत. हिंदुविरोधी आणि गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्याच्या या प्रकारांकडे चित्रपट परिनिरीक्षण मंडळाकडून (सेन्सॉर बोर्डाकडून) होत असलेले दुर्लक्ष संशयास्पद आहे. काँग्रेसच्या काळात चित्रपटसृष्टीत हिंदुविरोधी शक्तींना जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले गेले; मात्र आताही चित्रपटसृष्टीतील हिंदुविरोधी प्रवृत्तींचे वर्चस्व अद्यापही कायम आहे. जोपर्यंत हे वर्चस्व आणि अनैतिकता मुळासह मोडून काढली जात नाही, तोपर्यंत चित्रपटांतील हिंदुविरोधी, राष्ट्रविरोधी, संस्कृतीविरोधी प्रकार थांबणार नाहीत. त्यामुळे बलात्कार आणि व्यभिचार यांना प्रोत्साहन देणार्या या चित्रपटसृष्टीत आमूलाग्र पालट करण्यासाठी केंद्रशासनाने तातडीने लक्ष घालावे !
चित्रपटांतील व्यभिचार हा बलात्कार करण्याला प्रोत्साहन देणारा असून तो वेळीच रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक ! |